aap mla demands president rule in delhi for two to three months
aap mla demands president rule in delhi for two to three months  
विश्लेषण

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावा हो..! सत्तारूढ 'आप'मधूनच मागणी

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.दुसऱ्या कोरोना लाटेत राजधानी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. यामुळे दिल्लीत पुढील 3 महिन्यांसाठी आणीबाणी लावावी आणि राष्ट्रीय यंत्रणेकडे दिल्लीची सूत्रे द्यावीत, अशी मागणी आता सत्तारूढ आम आदमी पक्षातूनच (आप) होऊ लागली आहे. 

मोदी सरकारच्या नव्या कायद्यानुसार दिल्लीत आता नायब राज्यपालांना सर्व अधिकार आहेत.  तेसुद्धा कोरोनाच्या हल्ल्यातून बचावलेले नाहीत. नायब राज्यपाल अनिल बैजल यांना कोरोनाची लागण झाली आहे. रूग्णालये आणि ऑक्सिजनसाठी रस्तोरस्ती नागरिक फिरत असल्याचे चित्र दिल्लीत दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच उच्चपदस्थापर्यंतही आता कोरोना झपाट्याने पसरला आहे.

दिल्लीतील कोरोना परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयानेही नोंदवले आहे. तुम्हाला झेपत नसेल तर सारी सूत्रे केंद्रीय यंत्रणेकडे द्या, असेही न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते. त्यापाठोपाठ आपमधूनच दिल्लीत आणीबाणी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा एकप्रकारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर मानला जात आहे. 

दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जाहीर मागणी आपचे आमदार शोएब इकबाल यांनी आज केली. ते म्हणाले की, दररोज अनेक लोक रूग्णालयात खाटा मिळाव्यात यासाठी माझ्याकडे याचना करतात. त्यांचे दुःख मला पाहवत नाही. पण मी काहीही करू शकत नाही . त्यामुळे मला आमदार असल्याचीही लाज वाटते. दिल्लीत लोकांना रुग्णालयही मिळत नाही. लोकांना उपचार आणि ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधी हतबल झाले असून, किमान तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावली तर परिस्थिती आटोक्यात येईल अशी आशा मला वाटते.

दिल्लीतील कोरोना परिस्थिती 
24 तासांतील नवे रुग्ण : 24,235
24 तासांतील मृत्यू : 395
एकूण रुग्ण : 11 लाख 22 हजार 286
सक्रिय रुग्णसंख्या : 97 हजार 977
बरे झालेले : 10 लाख 08 हजार
पॉझिटिव्हिटी दर : 32.82 %
एकूण मृत्यू : 15 हजार 772

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT