विश्लेषण

कामगारांनी आवाज देताच आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटीला भेट देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज आले होते. पाहणी करून बाहेर पडतांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या कामगारांनी त्यांचा ताफा बाहेर पडतांना आदित्य ठाकरेंना आवाज दिला. बहुदा कामगारांना आपल्या समस्या, मागण्या मांडायच्या असतील असे समजून आदित्य ठाकरेंनी गाड्याचा ताफा थांबवला. गाडतून उतरून ते कामगारांजवळ गेले, तर "आम्हाला तुमच्या सोबत सेल्फी काढायचा आहे' असे म्हणत आग्रह धरला. आदित्य ठाकरेंनी देखील आनंदाने या कामगारांसोबत सेल्फी काढत त्यांचा आनंद द्विगुणीत केला. 

राज्याचे पर्यटनमंत्री तथा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. औरंगाबाद दौऱ्यात याची पुन्हा प्रचिती आली. केवळ महाविद्यालयीन, राजकारणीच नाही तर कंपनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये देखील आदित्य ठाकरेंबद्दल आकर्षण आणि उत्सुकता दिसून आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यभरात युवासंवाद कार्यक्रमातून तरुणाईशी संवाद साधला होता. आता पर्यटन मंत्री म्हणून ते राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. मुंबईतील नाईट लाईफवर टिका होत असली तरी तरुणांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले होते. या एका निर्णयाने आदित्य ठाकरे संपुर्ण राज्यात आणि देशात चर्चेचा विषय ठरले होते. 

पर्यटनमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा मंत्री म्हणून औरंगाबादचा हा दुसरा दौरा होता. ऑरिक सिटीला भेट देऊन त्यांनी येथील उद्योग, पुरवल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती तर घेतलीच, पण पर्यटनाच्या दृष्टीने इथे काय करता येईल याचा अंदाज घेत तशा सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या. तासभराच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि इतर नेते, पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा ताफा बाहेर पडला. 

तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजुला सर्वसामान्य नागरिक आणि कंपनीतील कामगार आदित्य ठाकरे यांची एक छबी टिपण्यासाठी मोबाईल हातात घेऊन उभे होते. गाड्यांचा ताफा वेगाने पुढे निघाला तेव्हा तिथे उपस्थित काही कामगारांनी आदित्य ठाकरे यांना आवाज दिला. तो ऐकताच आदित्य ठाकरे यांनी गाडी थांबवण्यास सांगितले आणि या कामगारांजवळ जाऊन त्यांची भेट घेतली. तेव्हा या कामगारांनी आदित्य ठाकरे यांच्या सोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी देखील कामगारांची इच्छा पूर्ण करत पाच मिनिटे कामगारांसोबत सेल्फी काढल्या आणि मगच त्यांचा ताफा मार्गस्थ झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT