मुंबई : 'झुरळाला घाबरलेली महिला पतीसमोरच घरात काम करणाऱ्या सुताराच्या अंगावर उडी मारते,' अशी जाहिरात तयार करणाऱ्या कीटकनाशक कंपनीला शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी दणका दिला आहे. कायंदे यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतल्यानंतर कंपनीने जाहीर माफी मागितली आहे. कायंदे यांनी राज्य महिला आयोगासह अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिलकडेही या कंपनीची तक्रार केली आहे. (After Manisha Kayandes complaint Midas Hygine India company recall advt)
मिडास हायजीन इंडिया लि. या कंपनीने 'लक्ष्मणरेखा' या उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखविले आहे. ही जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर झळकू लागल्यानंतर कायंदे यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. महिला झुरळांना घाबरून पतीच्या उपस्थितीत श्रमिकाकडे मदतीला जातात, ही कल्पनाच महिलांचा अपमान करणारी आहे. महिलांना घाबरट म्हणून दाखवणारी ही जाहिरात असल्याचा आक्षेप कायंदे यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी कंपनीला माफी मागण्याची मागणी केली होती.
कायंदे यांच्या आक्षेपानंतर कंपनीकडून जाहीर माफी मागण्यात आली आहे. याबाबतचे पत्र कंपनीने कायंदे यांना दिले आहे. जाहिरात सादर करीत असताना स्त्रियांचा, माता-भगिनींचा आणि 'लक्ष्णरेखा' या रामायणातील पवित्र संकल्पनेची विटंबना किंवा अपमान करण्याचा कोणत्याही प्रकारचा आमचा हेतू नव्हता. आपली हिंदू-संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहेच. तसेच आपण माता-भगिनीही तितक्यात आदरनीय, वंदनीय आहात. स्त्रियांचा आम्ही आदर करतो आणि यापुढेही करत राहू यात शंका नाही. जाहिरातीतील दृश्याने आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही जाहीर माफी मागतो, असं कंपनीचे व्यवस्थापक अमोल दुसाने यांनी पत्रात नमूद केलं आहे.
काय दाखवलं होतं जाहिरातीत...
जाहिरातीमधील दृश्य एका घरातील दाखवण्यात आले आहे. त्यामध्ये एक गृहिणी झुरळ पाहिल्यानंतर जवळच काम करत असलेल्या सुताराच्या अंगावर उडी मारते. सुतारही या गृहिणीला अलगद झेलतो. हा सर्व प्रकार या गृहिणीचा पती पाहत असतो, असं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. अशी जाहिरात करणं म्हणजे महिलांचा अपमान आहे, असा आक्षेप कायंदे यांनी घेतला होता.
कायंदे यांनी कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष समान नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून करण्यात आला होता. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून महिला खेळाडू भारताचे नाव जगभरात उज्वल करत आहेत. असे असूनही महिलांना घाबरट, दुबळे दाखवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे महिलांचा अपमान करून उत्पादन खपवण्याचा प्रयत्न यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशारा कायंदे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.