ahmedabad district council president will be from congress party  
विश्लेषण

भाजपच्या तोंडातील घास हिरावला...अहमदाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेसचाच अध्यक्ष

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतेक ठिकाणी वर्चस्व मिळविले आहे.

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा दारूण पराभव केला. राज्यातील सर्वच्या सर्व 31 जिल्हा परिषदांत भाजपने बहुमत मिळवले आहे. अहमदाबाद जिल्हा परिषदेत भाजपने 34 पैकी 30 जागा मिळवून मोठा विजय मिळवला. मात्र, या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप नव्हे तर काँग्रेसचाच उमेदवार बसणार हे निश्चित झाले आहे. यामुळे भाजपच्या तोंडातून अध्यक्षपदाचा घास हिरावला गेला आहे.  

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. सहाही महापालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला, तर 'आप'ने सुरत महापालिकेत जोरदार एंट्री केली. रविवारी गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांची निवडणूक झाली.

महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. राज्यात भाजपने ग्रामीण भागातही आपला वरचष्मा असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. भाजपने  सर्वच्या सर्व 31 जिल्हा परिषदा, 231 पैकी 196 पंचायत समित्या आणि 81 पैकी 74 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने केवळ एक नगरपालिका आणि 18 तालुका पंचायती जिंकल्या आहेत. 

अहमदाबाद जिल्हा परिषदेतही भाजपने 34 पैकी 30 जागा मिळवून मोठा विजय मिळवला होता. काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाले. भाजपच्या निवडून आलेल्या 36 उमेदवारांमध्ये एकही अनुसूचित जमातीचा नाही. मात्र, काँग्रेसच्या निवडून आलेल्या 4 जणांमध्ये एक जण अनुसूचित जमातीचा आहे. त्यामुळे मोठे बहुमत मिळूनही भाजपने अध्यक्षपद गमावले आहे. या ठिकाणी काँग्रेसचे पारूल पाधर या आता अध्यक्ष होणार आहेत. 

Edited by Sanjay jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT