विश्लेषण

देवेंद्रभाऊ, फसव्या कर्जमाफी योजनेबद्दल लाज वाटली पाहिजे : अजित नवले 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत इतके निकष घातले आहेत की तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. ही योजना कर्जमाफीची आहे कर्जवसुलीची आहे, असा प्रश्‍न पडला. देवेंद्रभाऊ तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शेतकऱ्यांना असा त्रास देताना, अशी खरपूस टीका शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयत अजित नवले यांनी केली. 

"शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिली गेली नाही तर येत्या 14 ऑगस्टपासून चक्का जाम आंदोलन राज्यात केले जाईल. शेतकऱ्यांच्या हितावर पाय देणाऱ्या मंत्र्यांचे पापी हात हे 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या वेळी झेंड्याला लागणार नाहीत, याची काळजी भूमिपूत्र घेतील, असा इशारा त्यांनी दिला. "याबाबत अधिक फोडून सांगायची गरज नाही. शेतकऱ्याच्या पोराला सगळे समजते आहे,' असे नमूद करून नवले यांनी आंदोलनाची दिशी स्पष्ट केली. 

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जनजागरण मोहिमेची सांगता आज पुण्यात झाली. या वेळी झालेल्या सभेत नवले यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला. ""फडणवीस यांच्या नियतबद्दल शंका येत आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. मात्र देवेंद्रभाऊने कर्जमाफीच्या माहितीसाठी ट्‌विट केलेल्या यादीत वर्धा जिल्ह्याचा समावेश नव्हता. वर्धा जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्ज थकबाकीदार नाही का? त्यामुळेच देवेंद्र यांच्या हेतूबद्दल शंका आहे. मुंबईतील शेतकऱ्यांची काळजी मात्र देवेंद्र यांना आहे. त्यांचा समावेश कर्जमाफीच्या यादीत केला. हे कशाचे लक्षण आहे, असा सवाल त्यांनी केला.

"शेतकऱ्याची ही आरपारची लढाई आहे. कोणत्या पक्षाचा अथवा संघटनेचा झेंडा या आंदोलनाला नाही. देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाचे अधिवेशन व्यवस्थित पार पाडतील. पण रस्त्यावरची लढाई शेतकरी जिंकल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT