विश्लेषण

अकोल्यातही कॉंग्रेसमधील फेरबदलाचे लोण? 

सरकारनामा ब्युरो

अकोला : महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. प्रदेश पातळीवर फेरबदलाचे हे लोण अकोल्यातही येण्याची शक्‍यता असल्याने पक्षांतर्गत आपली खुर्ची वाचविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे. 

राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्यातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांसह चिंतन बैठक घेण्यात आली. या संदर्भातील अहवाल लवकरच हायकमांडकडे सुपूर्द केला जाणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या झालेल्या सुमार कामगिरीमुळे प्रदेश आणि जिल्हा पातळीवरही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्‍यता असून त्याचे लोण अकोल्यातही पोचण्याची शक्‍यता आहे. 

अकोला महापालिकेत मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अठरा नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती होती. यंदा मात्र, महापालिकेची निवडणूक कॉंग्रेस पक्षाने स्वबळावर लढवीत बहात्तर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणात घसरण होत केवळ तेरा नगरसेवक विजयी झाले. पक्षांतर्गत वाढलेले कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाची अनेक शकले पडली. कॉंग्रेसमध्ये कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त असल्याने निवडणुकीत ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने काम केले. 

विशेष म्हणजे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांना दुसऱ्या गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा असलेला विरोध आणि त्यातून सुरू झालेले शह-काटशहाच्या राजकारणामुळे कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत दारुण पराभावाचा सामना करावा लागला. पक्षाचा पराभव हा केंद्र व राज्यातील सत्तेशी निगडित असल्याचे कॉंग्रेस महानगराचे नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या नियोजनाचा अभाव, तिकीट वाटपात झालेली मनमानी आणि त्यातूनच अनेक मात्तबर उमेदवारांना करावा लागलेला पराभवाचा सामना हे लपून राहिलेले नाही. पक्षीय पातळीवर या सर्व बाबींचा गंभीरतेने विचार होत असून प्रदेशाप्रमाणेच स्थानिक पातळीवर सुद्धा संघटनेतील मोठ्या पदांसोबतच जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्येही खांदेपालट करून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT