विश्लेषण

ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामागे भाजप ः विरोधक 

सरकारनामा ब्युरो

अकोला : महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अठ्ठेचाळीस जागांचा चमत्कार सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडलेला नाही. ईव्हीएममध्येच तांत्रिक बिघाड करून भाजपने स्वतः:चा विजय खेचून आणला असल्याचा आरोप करीत सर्व पक्षाच्या पराजित उमेदवारांनी बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतरचा हा शिमगा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

अकोला महापालिका निवडणुकीत ऐंशीपैकी अठ्ठेचाळीस जागांवर निर्विवाद विजय मिळवीत भाजपने सर्वच राजकीय पक्षांना जोरदार हादरा दिला. या विजयामुळे अनेक पक्षातील दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे इतके उमेदवार कसे जिंकू शकतात, असा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला आहे. त्यातून भाजप वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ, कॉंग्रेस, शिवसेना, मनसेसह आदी पक्षांच्या नेत्यांनी व उमेदवारांनी अशोक वाटीकेत एकत्र येऊन बैठक घेतली.

या बैठकीत कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अजय तापडिया, कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, भारिप बहुजन महासंघाचे निवडणूक निरीक्षण समितीचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड, मनसेचे शहराध्यक्ष पंकज साबळे, शिवसेनेचे नकुल ताथोड, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, कॉंग्रेसचे कपिल रावदेव, डॉ. स्वाती देशमुख, पुष्पा गुलवाडे, अविनाश देशमुख, भारिपच्या अरुंधती शिरसाट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत भारसाकळ, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, सुधीर काहकर, नितीन ताकवाले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन वाकोडे,आनंद बलोदे यांनी सहभाग घेतला. 

अशोक वाटिकेतील चर्चेनंतर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याबाबत निर्णय झाला. या बैठकीला उपस्थित नेत्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे निवेदन स्वीकारून न्यायालयात दाद मागावी लागेल, असे सांगितले. या नेत्यांनी केलेल्या आरोपाचे पुरावेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मागितले. परंतु, कोणाकडेच त्यासंदर्भात ठोस पुरावा नसल्याने कुणालाही त्यांचा मुद्दा रेटून धरता आला नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT