Krushna Sharma 
विश्लेषण

Akola Election : अकोल्यात पहिल्यांदाच दोन निवडणुका !; राजकीय पक्षांचा होणार केमिकल लोचा

Sachin Deshpande

Akola Loksabha and Akola West Bye Election : अकोला लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या दोन निवडणुका एकाच वेळी घेणे हे प्रशासनासाठी तारेवरची कसरत असेल. अगदी 12 दिवसांनी निवडणुकीचे नोटिफिकेशन निघणार असून, 28 मार्च रोजी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अकोल्यात भाजपला उमेदवार निवड करताना धर्मसंकट निर्माण झाले आहे. अकोला पश्चिम पोटनिवडणूक ही आमदार गोवर्धन शर्मा (लालाजी) यांच्या निधनानंतर होत आहे. त्यामुळे लोकसभेत ज्याप्रमाणे संजय धोत्रे यांच्या दुर्धर आजारामुळे त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे लालाजींचा मुलगा कृष्णा शर्मा यांना यामुळे तिकीट पक्षाला घोषित करावे लागेल. मुळात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाहता ही निवडणूक अविरोध होण्याची गरज आहे. पण, तशी शक्यता लोकसभा निवडणूक पाहता निर्माण होताना दिसत नाही.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने लालाजींचे ज्येष्ठ पुत्र कृष्णा शर्मा यांना तिकीट देण्याची गरज आहे, तशी मागणी अकोल्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची आहे. कृष्णा शर्मा पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. त्याचबरोबर गोवर्धन शर्मा यांची सर्व राजकीय, सामाजिक कामे हे कृष्णा शर्मा हेच पाहत होते. भाजप व्यापारी आघाडीचे पद कृष्णा शर्मा यांच्याकडे आहे. गोवर्धन शर्मा हे भाजपचे ज्येष्ठ आमदार होते. त्यांचे नुकतेच कॅन्सरने निधन झाले. अतिशय कठिण काळात गोवर्धन शर्मा यांनी भाजपला अकोल्यात जिवंत ठेवले. लालाजी सहा वेळा आमदार होते. त्याचे कार्य पुत्र कृष्णा शर्मा याच्या माध्यमातून पुढे नेण्याची गरज भाजपच्या ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे. कृष्णा शर्मा यांना या निवडणुकीत उमेदवारी देत ती बिनविरोध करण्याची जबाबदारी निश्चित भाजपच्या राज्यातील श्रेष्ठींनी घेण्याची गरज आहे. पण, लोकसभा निवडणूक सोबत असताना तशी शक्यता राजकीयदृष्ट्या धूसर आहे. त्यामुळे भाजप त्याच बरोबर इतर पक्षातील इच्छुक यांनी आजपासून कंबर कसली आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीत वंचित घटक होतो की नाही हे अद्याप पर्यंत निश्चित नाही. असे असताना महाविकास आघाडी स्वतंत्र लढली तर काँग्रेस, वंचित, शिवसेना यांचा सर्वांचे उमेदवार या निवडणुकीत असतील. त्यामुळे भाजप इच्छुकांमध्येदेखील या पोटनिवडणूक घोषणेमुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. अकोल्यात भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल, हरिश आलिमचंदानी, डाॅ. अशोक ओळंबे हे प्रमुख दावेदार आहेत. वंचित महाविकासचा घटक झाली तर विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना या ठिकाणी दावेदारी करणार आहे. यात राजेश मिश्रा यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख हेदेखील तिकीट मागू शकतात. तेदेखील अकोला पश्चिमचे राजकीयदृष्ट्या अतिशय स्ट्राँग उमेदवार आहेत. काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत. यात माजी आमदार बबनराव चौधरी, इंटक नेते प्रदीप वखारीया यांची नावे आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाकडे या मतदारसंघात प्रभावी उमेदवार नाही. महाविकास आघाडीसोबत आघाडी झाली नाही तर, वंचित या ठिकाणी कोणता उमेदवार देतो हेदेखील महत्त्वाचे असेल. कारण त्या उमेदवाराचा थेट फायदा हा लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. वंचितमध्ये या ठिकाणी बालमुकुंद भिरड, संतोष हुशे, नीलेश देव यांच्या नावांची चर्चा या मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पाहता संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढणार आहे.

अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया 28 मार्च रोजी सुरू होईल. 4 एप्रिल रोजी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 5 एप्रिल रोजी नामांकन तपासणी, 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान होईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक निकालाबरोबर अकोला पश्चिम पोटनिवडणुकीचा निकाल 4 जून रोजी घोषित करण्यात येईल. एकाच वेळी दोन निवडणुकांमुळे अकोल्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत वंचितने प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्याचबरोबर भाजपची उमेदवारी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप यांना देण्यात आली आहे. वंचित सोबत आघाडी झाली नाही तर काँग्रेसचे डाॅ. अभय पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार दाळू गुरुजी यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. वंचितच्या आघाडीचा तिढा कधी सुटतो, याकडे राज्याबरोबर अकोलेकरांचे लक्ष आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT