Arjun Dangle ON Ambedkarism and Marxism Sarkarnama
विश्लेषण

Ambedkarism Vs Marxism: दलित चळवळीच्या राजकीय, संघटनात्मक पातळीवर रंगलेला वाद

Arjun Dangle ON Ambedkarism and Marxism: १९५२ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मध्य मुंबईतून संयुक्त मतदारसंघात बाबासाहेब उभे होते. त्या निवडणुकीत ‘डॉ. आंबेडकरांना मतदान करू नका,’ असा प्रचार कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांनी केला. ही सल अजूनही काही लोकांच्या मनात आहे.

सरकारनामा ब्यूरो

📝 3-Point Summary

  1. आंबेडकरी चळवळ आणि वैचारिक मतभेद:
    आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर वैचारिक संघर्ष वाढले, विशेषतः मार्क्सवाद विरुद्ध आंबेडकरवाद या वादामुळे दलित साहित्य, राजकारण आणि संघटनात्मक पातळीवर फूट पडली.

  2. इतिहासातील संघर्षांची उदाहरणे:
    १९५२ च्या निवडणुकीतील कम्युनिस्टांचा विरोध, दादासाहेब गायकवाड व बापूसाहेब कांबळे यांच्यातील संघर्ष, आणि बाबूराव बागुल व नामदेव ढसाळ यांच्यावर लावलेले मार्क्सवादी ठपके हे या वादाचे ठळक उदाहरण होते.

  3. बाबासाहेबांचा दृष्टिकोन आणि खरी लढाई:
    बाबासाहेबांनी मार्क्सवादाचा आंधळा विरोध केला नाही, तर धर्मांध वर्णवर्चस्ववादी शक्तींचा विरोध हा त्यांच्या आंबेडकरवादाचा खरा हेतू होता.

अर्जुन डांगळे

चळवळ म्हटली म्हणजे त्यात जरी वैचारिक अधिष्ठान आणि समान सूत्र असले तरीही त्यात विविध प्रकारच्या वैचारिक छटा असणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे चळवळीत वैचारिक पातळीवर मतभेद होणे साहजिक असते. गांधीवादी, मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी चळवळीत याचे प्रत्यंतर येते. आंबेडकरी चळवळ जिला दलित चळवळ असे संबोधले जाते तीदेखील याला अपवाद नव्हती. तिच्यातदेखील वैचारिक वाद उत्पन्न झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हयात असतानाही सामाजिक पातळीवर असे वाद होते पण बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे हे किरकोळ ठरले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हे वाद टोकापर्यंत गेले. अनेक प्रकारचे वाद होते. त्याची मीमांसा मी येथे करत नाही. पण एका वादाविषयी बोलणे आवश्यक आहे. कारण त्याचे दूरगामी परिणाम आंबेडकरी चळवळीवर झालेले दिसतात. केवळ राजकीय पटलावर हा वाद रंगला असे नाही तर दलित चळवळीच्या राजकीय, साहित्यिक आणि संघटनात्मक पातळीवर सातत्याने हा वाद लढविण्यात आला. हा वाद म्हणजे ‘मार्क्सवाद’ विरुद्ध ‘आंबेडकरवाद’ हा होय.

१९५२ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मध्य मुंबईतून संयुक्त मतदारसंघात बाबासाहेब उभे होते. त्या निवडणुकीत ‘डॉ. आंबेडकरांना मतदान करू नका,’ असा प्रचार कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांनी केला. ही सल अजूनही काही लोकांच्या मनात आहे. पण १९५२ मध्येच म्हणजे २९ फेब्रुवारी १९५२ रोजी बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड यांना जे सविस्तर पत्र लिहिले आहे त्यांनी बाबासाहेबांनी राजकारणातून निवृत्त होण्यासंबंधी लिहिले आहे.

ते लिहितात ‘माझ्या आपल्या लोकांना असाही सल्ला देण्याचा कल आहे, की कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्याने त्यांचा ताबडतोब फायदा होत असेल तर त्यांनी तसे करावे. शेवटचा मुद्दा तुम्ही गंभीरपणे विचार करावा असा आहे. तो म्हणजे माझी (फेडरेशनमधून) पक्षातून आणि त्याचबरोबर माझ्या राजकीय कर्तव्यातून सुटका (मुक्तता) करावी. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील मूळ इंग्रजीमधील पत्रदेखील त्यांनी सोबत छापले आहे. याचे मूलगामी चिंतन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या वतीने अभूतपूर्व असे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे नेतृत्व हे बाबासाहेब आंबेडकर यांनी करावे ही प्रबोधनकार ठाकरेंची इच्छा होती; पण नेतृत्वाला नकार देत बाबासाहेबांनी माझा पक्ष यात सामील होईल, असे सांगितले. १९५७ च्या निवडणुकीत एकसंध रिपब्लिकन पक्षाचे १४ आमदार, ७ खासदार आणि अनेक नगरसेवक निवडून आले.

त्या काळात मुंबईचे महापौरपद, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षपद रिपब्लिकन पक्षाकडे होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर नेतृत्वाचा वाद सुप्त स्वरूपात होताच. ‘काळ्या कोटातले नेतृत्व’ की ‘धोतरातले नेतृत्व’ असे त्याचे स्वरूप होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना पक्षात, तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीत आदराचे स्थान होते. ॲड. बापूसाहेब तथा बी. सी. कांबळे हे रिपब्लिकन पक्षातील तरुण, विद्वान आणि विचारवंत नेतृत्व होते. त्यांनी १९५४मध्ये दादासाहेब गायकवाड यांच्यावर आरोप केला, की दादासाहेब कम्युनिस्टांच्या आहारी गेले आहेत. बापूसाहेबांच्या या कृतीमागे रिपब्लिकन पक्षाच्या तयार होणाऱ्या घटनेचे कारण होते.

इथे सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा, की एकसंध आणि बलाढ्य अशा रिपब्लिकन पक्षामध्ये पहिली फूट ही अशी पडली. या फुटीचे लोण राजकीय पातळीवर शहरा-शहरात, जिल्ह्या-जिल्ह्यात तर पोहोचलेच पण धम्म चळवळ, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवरही याचे लोण पोहोचले. आंबेडकरी चळवळीतील गायक, कवी, शाहीर यातून सुटले नाहीत. दादासाहेब गायकवाड यांनी त्या वेळी उत्तर दिले, की ‘कम्युनिस्ट’ हे भाकरीसाठी लढत असतील, बेकारीविरुद्ध लढत असतील, समतेसाठी लढत असतील तर आम्ही ‘कम्युनिस्ट’ आहोत. आम्ही हाडाचे कम्युनिस्ट आहोत.’ साठ-सत्तरीच्या दशकात दलित साहित्याची चळवळ ही बहरात होती. शोषण व्यवस्थेला, प्रस्थापित साहित्यमूल्यांना वाङ्‍मयीन पातळीवर नाकारणारी ही चळवळ होती. सम्यक परिवर्तनाची मागणी करणारी ही साहित्यिक चळवळ होती. डॉ. म. ना. वानखडे, डॉ. म. भि. चिटणीस या दिग्गजांनी या आशय, आकार आणि दिशा दिली.

बाबूराव बागुल यांनी विद्रोह, नकार आणि विज्ञाननिष्ठा या त्रिसूत्रीद्वारे वैचारिक अधिष्ठान देऊन ती भक्कम केली. विद्रोही भावनेचा एक आविष्कार साहित्यात दिला. त्या बाबूराव बागुल यांना कम्युनिस्ट ठरविण्याची होड लागली. निश्चितच बाबूराव बागुल एकेकाळी कम्युनिस्ट चळवळीत होते. गंमत अशी, की बाबूराव बागुलांवर आरोप करणारी ही मंडळी आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचे ‘कार्डहोल्डर’ असलेल्या कॉ. अण्णा भाऊ साठे यांना आदर्श मानायची. दलित साहित्य चळवळीत ‘आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद’ असे काहूर माजविले गेले. दलित साहित्य चळवळीत अशी उभी फूट पडल्याचे भासविण्यात आले. ‘दलित साहित्य संमेलन’ विरुद्ध ‘अस्मितादर्श लेखक मेळावा’ अशा राहुट्या उभ्या राहिल्या होत्या. दलित पँथरसारख्या संघटनेतही हा वाद पेरला गेला.

नामदेव ढसाळ यांना ‘मार्क्सवादी’ ठरविण्यात आले. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाकडे त्यांचा कल निश्चितच होता; पण त्यांनी ‘आंबेडकरवाद’ नाकारला असे म्हणता येणार नाही अन् नाकारला असता तर ‘तुझे बोट धरून चालताना’ या कवितासंग्रहाची निर्मिती झाली असती का? कुठल्याही क्रांतिकारी, परिवर्तनवादी जाणिवा बाळगणाऱ्या कलावंताला जगातील क्रांतिकारी तत्त्वज्ञान, क्रांतिकारी संघर्ष, घटना, प्रवृत्तीबद्दल ओढ असणे साहाजिकच आहे. त्याने सादर केलेला दलित पँथरचा जाहीरनामा आजही आंबेडकर चळवळीशी, तत्त्वज्ञानाशी सुसंगत असाच आहे.

बाबासाहेबांनी निश्चितच भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात व इतर प्रश्नांबाबत कम्युनिस्टांवर टीका केली आहे, विरोध केला आहे. पण ते मार्क्सवादाचे आंधळे विरोधक नव्हते. ज्या काठमांडूच्या म्हणजे ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या भाषणाचा दाखला काही जणांकडून दिला जातो त्यांना सांगावेसे वाटते, की मार्क्सवादाला किंवा कम्युनिस्टांना जी ‘हिंसा’ अभिप्रेत आहे ती फक्त त्यांना त्याज्य वाटत होती. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा हा लाल होता. ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे आपले दोन शत्रू आहेत हे त्यांनी मनमाडला रेल्वे कामगारांसमोर भाषण करताना सांगितले.

मुंबईत नरे पार्कवर १९५४ मध्ये भाषण करताना त्यांना सांगितले ‘आम्ही सोबतीला फुले, वाटल्यास मार्क्स घेऊ. ब्रिटिशांनी जो काळा कायदा कामगारांवर लादला होता त्याविरुद्ध बाबासाहेब कॉ. डांगे, कॉ. मिरजकर, ब्रिटिश कम्युनिस्ट ब्रेटली, जमनादास मेहतांबरोबर मैदानात उतरले आहेत. मथितार्थ हाच ही ‘आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद’ किंवा ‘आंबेडकरवाद विरुद्ध कुठलेही परिवर्तनवादी क्रांतिकारी तत्त्वज्ञान’ हा कलह असल्याचे कारणच नाही. खरा मुद्दा हा आहे, की ‘आंबेडकरवाद विरुद्ध धर्मांध वर्ण वर्चस्ववादी शक्ती हा मूलभूत झगडा आहे. तो उफाळून वर येऊ नये म्हणून इथले हितसंबंधी, त्यांच्या पालख्या वाहणारे, काल्पनिक संघर्ष उभे करून आंबेडकरी चळवळीत संभ्रम निर्माण करतात.

 4 FAQs with One-Line Answers

  1. आंबेडकरवाद विरुद्ध मार्क्सवाद हा वाद कधी सुरू झाला?
    बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर, विशेषतः १९५०-६० च्या दशकात हा वाद अधिक तीव्र झाला.

  2. बाबासाहेबांनी मार्क्सवादाचा विरोध केला होता का?
    त्यांनी अंधारलेल्या हिंसक मार्क्सवादाचा विरोध केला, पण सामाजिक समतेच्या विचारांना नाकारले नाही.

  3. या वादाचा दलित साहित्यावर काय परिणाम झाला?
    दलित साहित्य संमेलन आणि अस्मितादर्श लेखक मेळावा यासारखे वैचारिक विभाग निर्माण झाले.

  4. खरा संघर्ष कोणत्या तत्वांमधला आहे?
    आंबेडकरवाद विरुद्ध धर्मांध वर्णवर्चस्ववादी शक्ती यांच्यात खरा संघर्ष आहे, ना की मार्क्सवादाशी.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT