Amit Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Amit Thackeray : निवडणूक लढवू पाहणाऱ्या दुसऱ्या ठाकरेंना आधी पक्षाला चक्रव्यूहातून काढावे लागणार!

Amit Thackeray contest Vidhan Sabha Election : अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची इच्छा पूर्ण झाली तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे कुटुंबातील ते दुसरे सदस्य ठरतील.

अय्यूब कादरी

MNS Political News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. ते कायम 'किंगमेकर' या भूमिकेत राहिले. शिवसेनेची सत्ता आली, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे झाले, मात्र ते बाळासाहेबांच्या ऐकण्यातीलच होते. मुख्यमंत्री कुणीही असले तरी रिमोट मात्र बाळासाहेबांनी आपल्याच हाती ठेवला होता. बाळासाहेबांचा महाराष्ट्रात आदर केला जातो, त्यासाठीच्या कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे.

राज्यात 1995 मध्ये शिवसेना -भाजप युतीची सत्ता आली. आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे हे शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री एकाच पंचवार्षिकमध्ये बनले. त्यानंतर युतीची सत्ता येण्यासाठी 2014 हे वर्ष उजाडावे लागले. काळ बदलत गेला, राजकारण बदलत गेले. निवडणूक न लढवण्याचा बाळासाहेबांचा बाणा त्यांच्या पुढच्या पिढीने बाजूला सारला आणि आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री राहिले. आता आणखी एक ठाकरे निवणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. होय, अमित ठाकरे! मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray).

अमित यांनी निवडणूक लढवली तर असे करणारे ते... -

मनसेच्या 16 सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा नेत्यांनी व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांनी स्वतःही निवडणूक लढवण्याची इच्छा या बैठकीत व्यक्त केली. मतदारसंघ कोणता, याचा निर्णय नंतर होणार आहे, असे मनसेच्या गोटातून सांगण्यात आले.

अमित यांनी निवडणूक लढवली तर असे करणारे ते ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, मात्र त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती. ते विधान परिषदेवर गेले होते. अमित यांचे वडील राज ठाकरे(Raj Thackeray) यांनीही निवडणूक लढवलेली नाही.

मनसेचा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय -

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणूक मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. या दैऱ्यांपूर्वी मनसेने(MNS) त्या त्या भागात आपली टीम पाठवली होती. या टीममधील सदस्यांनी काही लोकांच्या भेटी घेऊन पक्षाबद्दलचे मत, पक्षाची परिस्थिती कशी आहे, हे जाणून घेतले होते. पक्षसंघटनेत शिथिलता आली आहे, आघाडीवर राहून काम करणाऱ्या मनसेच्या अनेक जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. या बाबींचा परिणाम काय होणार, हे या टीमने जाणून घेतले होते.

सतत भूमिका बदलण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका होत असते. 2014 ते 2019 या कालावधीत राज्यातील विरोधी पक्ष निष्क्रिय असल्यासारखेच होते. त्या काळात विरोधी पक्षाची स्पेस काबीज करणे मनसेला शक्य झाले असते, मात्र तसे झाले नाही. राज ठाकरे सक्रिय झाले नाहीत. जिल्हा, तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बळ दिले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे अनेक पदाधिकारी मनसे सोडून अन्य पक्षांत गेले.

बदलत्या भूमिकांमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश -

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठाणे, रत्नागिरी वगळता मनसेचा अन्य मतदारसंघांत फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत घेऊ नये, असा आवाज भाजपमधून उठला होता. त्यामुळे राज ठाकरे यांची कोंडी झाली. राज ठाकरे यांनी 2019 च्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात धडाक्यात प्रचार केला होता. मात्र निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार करत आहेत का, अशी टीका त्यावेळी झाली होती.

2024 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी 'यू टर्न' घेतला. देशाला मोदींची गरज आहे, असे म्हणत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. या लोकसभा निवडणुकीतही मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. निकालाच्या काही दिवसांनंतर राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या बदलत्या भूमिकांमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला. पक्षाची एकंदर परिस्थिती अशी असताना आता अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा विचारही कधी केला नव्हता. तीच परंपरा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही पुढे चालवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाले आणि मुख्यमंत्री कोण, यावर खल सुरू झाला. स्पर्धा, नाराजी टाळण्यासाठी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि त्या भूमिकेत ते राज्यभरात लोकप्रिय ठरले. आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पर्यावरणमंत्री बनले. शिवेसेनेत अंतर्गत ठिणगी पडण्यासाठी हे एक निमित्त ठरले. या मंत्रालयासाठी रामदास कदम इच्छुक होते, मात्र ते आदित्य यांना मिळाले होते.

राज ठाकरे हे जिल्हास्तरीय नेत्यांना भेटत नाहीत, अशी त्यांच्याबाबत सतत ओरड होत असते. राजकारण हे 24 तास आणि 365 दिवस करण्याची गोष्ट असते. दुपारी उशीरा उठून राजकारण होत नाही, अशी टीका त्यांच्यावर सतत केली जाते. अमित ठाकरे सक्रिय झाले आणि त्यांच्यामुळे हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र तसा काही बदल अद्याप तरी दिसून आलेला नाहीय. अमित ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. तो त्यांना पेलवणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT