विश्लेषण

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 7 ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्यात

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपची महाजनादेश आणि शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेली " शिवस्वराज्य यात्रा ' 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे. 7 रोजी गंगापूर तर 10 ऑगस्टला ही यात्रा कन्नड तालुक्‍यात पोचणार आहे. शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निघालेल्या यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत. 

राज्यात सध्या सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून स्वतंत्र यात्रा काढण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला विदर्भातून तर शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या मराठवाड्यात सुरू आहे. या यात्रेदरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून केले जाणारे विकासाचे दावे कसे खोटे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून केला जाणार असल्याचे बोलले जाते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्‍यात मेळावे, संवाद साधल्यानंतर ही शिवस्वराज्य यात्रा तुळजापूर येथे तुळजा भवानीचे दर्शन घेऊन 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, परभणी जिल्ह्यात येणार आहे. या दरम्यान राज्यातील 55 विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मतदारसंघातील डॉक्‍टर, वकील, शिक्षक, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी यांच्याशी विशेष संवादाचा कार्यक्रम होणार आहे. 

शिवाय संबंधित मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांसाठी नेत्यांची जाहीर सभा देखील घेतली जाणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्यांची पत्रके तसेच युती सरकारच्या पाच वर्षातील गैरकारभार चव्हाट्यावर आणणारी काही पत्रके देखील वाटली जाणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने प्रत्येक मतदासंघात शिवस्वराज्य सनदीचे वाचन केले जाईल. रयतेचे राज्य आणण्यासाठी पक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्प पत्र म्हणेज ही सनद असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा 
शिवस्वराज्य यात्रेसोबतच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य जननी जिजाऊ माता या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येकी तीन विजेत्यांना शिवस्वराज्य जननी जिजाऊ माता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 11 ते 18 ऑगस्टदरम्यान, प्रत्येक मतदारसंघात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT