Manoj Jarange Patil : ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा !’ – कुसुमाग्रज
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत ‘फक्त लढ’ म्हटले आहे. पण, त्या मागचा नेमका हेतू आंबेडकरांनी सांगितलेला नाही. आंबेडकरांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत गरिब आणि श्रीमंत मराठे यांच्यातील आरक्षण विषयावर असलेला परंपरागत वाद सांगत मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा लढण्याचा सल्ला दिला.
हा सल्ला कोणाला ‘इशारा’ तर देणारा नव्हता ना? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. या इशाऱ्याने महाविकास आघाडीच नव्हे तर, महायुतीचे देखील कान टवकारले आहेत. आंबेडकरांनी दिलेला हा सल्ला दूरगामी परिणाम करणारा तर आहेच. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करु शकतो इतका तो स्फोटक आहे.
आंबेडकरांनी हा सल्ला मुळात मनोज जरांगे पाटील हे मुंबईत मराठा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाच्या अगदी जवळपास दिला आहे. त्यामुळे आपसुकच मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर या आंदोलनातील इतर नेत्यांना राजकीय चूणूक दाखविणारा आणि नवी राजकीय महत्वाकांक्षा निर्माण करणारा असा हा सल्ला ठरेल. हे होत असताना प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांना मोठा राजकीय फटका आणि काहींचे मतविभाजन यातून होताना दिसते.
अशा परिस्थितीत आंबेडकरांचा सल्ला मानत मनोज जरांगे पाटील यांनी ‘वंचित’ सोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला तर लोकसभा काय महाराष्ट्राच्या विधानसभेचे अनपेक्षित निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी आंबेडकर यांचा स्फोटक आणि राजकीय भूकंप करणारा हा सल्ला राज्यातील राजकीय चित्र बदलणारा असेल. राज्यात ‘वंचित’ ओबीसींसह राजकारण करत आहे. महाराष्ट्रात 50 ते 52 टक्के ओबीसी आहेत. 30 ते 33 टक्के मराठा आहेत. अशा वेळी ‘वंचित’ची एक ‘व्होट बँक’ आणि हे नवे समीकरण निर्माण झाल्यास काय काय होते हे पाहण्यासारखे असेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षण संघर्षात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आरक्षणाच्या मागणी विषयीची प्रामाणिकता सिद्ध केली आहे. त्यामुळे आपसुकच त्यांच्यामागे एक वलय निर्माण झाले आहे. हे वलय केवळ राजकारणात ‘मिक्स’ करायचे आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ‘फक्त लढ म्हणा’च्या हाकेला ‘ओ’ देत टाळी दिली तर राज्यात नव्या आघाडीचे समीकरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जर हे झाले तर याचा आपसुक दबाव हा काँग्रेसवर केंद्रित होईल.
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी यापूर्वीच ‘वंचित’ला महाविकास आघाडीत बरोबर ‘इंडिया’ आघाडीत घेण्याचा सल्ला काँग्रेसला दिला होता. तो सल्ला अद्याप काँग्रेस श्रेष्ठींनी म्हणावा तसा मनावर तर घेतलेला नाही. उलट काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ‘वंचित’ने कसे 2019 मध्ये उमेदवार पाडले यांचे दाखले देत त्यात मिठाचा खडा टाकण्याचा उद्योग केला. अशा वेळी आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटील यांना दिलेला सल्ला राज्यातील मराठाबहुल मतदार संघात बदल घडविणारा आणि प्रस्थापित मराठ्यांना ‘डिस्टर्ब’ करणारा नक्की आहे.
‘वंचित’च्या या सल्ल्याला मनोज जरांगे पाटील यांनी होकार दिला तर ते जालनामधून निवडणूक लढण्याची शक्यता वाढते. अशा वेळी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक अडचणीची ठरू शकते. इतकेच नव्हे तर जरांगे पाटील यांनी राज्यात ‘वंचित’सोबत ‘सिट शेअरींग’ केले आणि दमदार मराठा उमदेवार दिले तर लोकसभा निकालानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील चित्र अगदी वेगळे असेल.
आंबेडकर यांनी दिलेला सल्ला मनोज जरांगे किती मनावर घेतात आणि त्यांनी तो मनावर घेऊ नये, यासाठी कोण कोण काय काय प्रयत्न करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेषतः मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने सोडविण्यासाठी राज्य सरकारला (महायुती) अधिक मेहनत घ्यावी लागेल. अन्यथा, आंबेडकरांचा सल्ला महायुतीची घोडदौड थांबविण्यास निश्चित मदत करणारा असेल. भविष्यात आंबेडकरांबरोबर जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे घटक झाले तर मात्र…
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.