sanjay-kaka-babar 
विश्लेषण

संजय काकांच्या कृष्णा खोरे महामंडळावर अनिल बाबरांची नजर 

किमान वीसहून अधिक विधानसभा मतदार संघांवर या महामंडळाचा थेट परिणाम आहे.

सरकारनामा

सांगली :  महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ सध्या आर्थिक बलाढ्य आहे. केंद्र आणि राज्याकडून या महामंडळाच्या विस्तारीत कामाना मंजुरी मिळाली असून निधीचा ओघही कायम आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या संभाव्य महाशिवआघाडी सत्तेवर आली तर  या महामंडळावर नेमणूक हा नक्कीच कळीचा मुद्दा राहणार आहे.

भाजप-शिवसेना युतीत हा महामंडळ शिवसेनेकडे होते, त्यामुळे आघाडीतही ते सेनेकडेच रहावे, अशी आग्रही भूमिका राहणार आहे. त्यामुळे आमदार अनिल बाबर यांची या महामंडळावर उपाध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचा व्याप मोठा आहे. कृष्णा नदी, उपनद्यांचे खोरे, सिंचन योजना, नदीच्या पाण्याची स्वच्छता यांसह खोऱ्यातील शेतीच्या विकासात या महामंडळाचे योगदान राहिले आहे. सिंचन योजनांचा पसार प्रचंड मोठा आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे बुद्रुत या योजनांचे काम अजूनही मोठ्या प्रमाणात बाकी आहे.

सातारा जिल्ह्यात सिंचनाची कामे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्‍यांचा विकास या योजनांतूनच होणार आहे. किमान वीसहून अधिक विधानसभा मतदार संघांवर या महामंडळाचा थेट परिणाम आहे. 

त्यामुळे भाजपने ही संधी साधली होती. खासदार संजय पाटील यांना उपाध्यक्षपद दिले होते. हे खाते शिवसेनेच्या वाट्याला असताना नियुक्ती केली गेली होती. त्यावेळी संजय पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता, मात्र शिवसेनेने आपल्या वाट्याचे महामंडळ असल्याने तेथे प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचीही नियुक्ती केली.

त्यामुळे दोन उपाध्यक्ष झाले, त्यांचा दर्जा समान झाला. युतीत भाजप नेहमी कुरघोड्यांच्या मुडमध्ये होती. त्यांनी बानुगडे यांच्या निवडीला शह देण्यासाठी संजय पाटील यांच्या पदाला कॅबिनेटचा दर्जा देऊ केला.

आता भाजप-शिवसेना युती तुटली आहे. नवी महाशिवआघाडी आकाराला येत आहे. अशावेळी राज्यातील मंत्रीमंडळ अत्यंत महत्वाची महामंडळे यावर खलबते सुरु झाली आहेत. त्यात कृष्णा खोरे विकास महामंडळ महत्वाचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मुळे हट्ट करण्यासाठी शिवसेना नक्कीच या महामंडळाचा ताबा आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

खासदार संजय पाटील यांच्याकडून हे महामंडळ आता आमदार अनिल बाबर यांच्याकडे जाऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्‍यात आपला गट बांधण्यासाठी अजितराव घोरपडे यांना हे महामंडळ आणि ताकद देण्याचा डाव शिवसेनेने खेळला तरी आश्‍चर्य वाटायला नको.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT