Aparna Yadav joins BJP
Aparna Yadav joins BJP Sarkarnama
विश्लेषण

मुलायमसिंहांच्या सूनबाई भाजपच्या घरातही पाडणार फूट?

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारणाने वेग पकडला असून, मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्यामुळे भाजपमध्येच वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्षाकडून 2017 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. लखनौ कॅन्टोन्मेंटमधून त्या मैदानात उतरल्या होत्या. काँग्रेसच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. आता याच रिटा बहुगुणा जोशी भाजपमध्ये आहेत. जोशी या भाजकडून लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांनी लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून मुलासाठी उमेदवारी मागितली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र नीरज सिंह यांनीही लखनौ कॅंटोन्मेंट किंवा इतर मतदारसंघातून तिकीटासाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे.अपर्णा यादव यांनीही याच मतदारसंघावर दावा सांगितल्याचे समोर येत आहे.

एका कुटुंबात एकच पद, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे मुलाच्या तिकिटासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारीही जोशी यांना दाखवली आहे. दरम्यान, लखनौ कॅन्टोन्मेंटमधून कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न भाजप नेत्यांसमोर आहे. रिटा बहुगुणा जोशी या मुलासाठी खासदारकीवर पाणी सोडण्यास तयार आहेत. याचवेळी राजनाथसिंह हेसुद्धा मुलासाठी आग्रही आहेत. आता यात अपर्णा यादव यांची भर पडली आहे. यामुळे एका मतदारसंघावरून भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मतदारसंघात तिकिट न मिळाल्यास भाजपला बंडखोरीचा सामनाही करावा लागू शकतो.

अपर्णा यांनी सगळ्यांनाच धक्का देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मागील काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती. आता अखिलेश यांच्या भावाच्या पत्नीला फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे. अपर्णा यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Aparna Yadav joins BJP)

मुलायमसिंह यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) धुरा सांभाळत आहेत. मुलायमसिंह यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांचा राजकीय प्रभाव फारसा नसला तरी त्या समाजकारणात खूप आधीपासून सक्रिय आहेत. त्या 'बीअवेअर' नावाची सामाजिक संस्था चालवतात. ही संस्था निराधार महिलांसाठी काम करते. याचबरोबर ही संस्था लखनौमध्ये गोशाळा चालवते. राज्यात भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी थेट लढत असताना अपर्णा यांच्या पक्षांतरामुळे खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT