शिवाय त्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत भय्यासाहेब आंबेडकर यांना चांगली मते मिळाली होती. भारिपने पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आखाड्यात उतरविले. बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस, बापूसाहेब काळदाते आदी नेते मैदानात प्रचारासाठी उतरले होते. महाराष्ट्रातून जवळपास दोन हजार कार्यकर्ते प्रचारासाठी नांदेडला आले होते.
निवडणुकीला काही दिवस होते. ‘राजेश हॉटेल’वर आमचा तळ होता. रात्रीच्या दोन वाजता प्रचार आटोपून आम्ही आढावा घेण्यासाठी बसलो होतो. या वेळी बातमी आली, की नांदेड मतदारसंघात जी गावे आहेत, तिथे आमच्या विरोधी पक्षांचे लोक घराघरावर निळ्या शाईत ‘जयभीम’ असे लिहिणार आहेत. उद्देश हा, की मग ते प्रचार करणार ‘बघा निवडून येण्याअगोदरच हे लोक किती माजले आहेत. निवडून आल्यानंतर किती माजतील!’ निवडणूक जातीय पातळीवर नेण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता.
अकोल्यामधील निवडणुकीतील अनुभव गाठीशी होता. १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विजयी होतील, असाच माहोल होता; पण शेवटच्या दिवशीच्या ‘दलित-मुस्लिम भाई-भाई, हिंदू कौम कहाँ से आयी’ अशा घोषणा विरोधकांनी प्रचार मोर्चात घुसून दिल्या होत्या आणि निवडणूक धार्मिक द्वेषाच्या पातळीवर नेली होती. नांदेडला जिल्ह्याचे पोलिसप्रमुख वाय. सी. पवार हे होते. हा प्रकार थांबविण्यासाठी त्यांना भेटायचे ठरले. मी, अविनाश महातेकर आणि ॲड. बी. एच. गायकवाड तडक पोलिस मुख्यालयात आलो. बाजूलाच पवारसाहेबांचे निवासस्थान होते.
रात्री अडीच-तीनच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. जीपमधून उतरलो आणि डीएसपी ऑफिसच्या दिशेने निघालो. समोर बंदूक घेऊन शांतपणे उभा असलेला पहारेकरी दिसत होता. त्या पोलिसात अन् आमच्यात तीसएक फुटांचे अंतर असावे. मोठ्याने तो ओरडला, ‘कौन है?’ आणि पवित्रा घेऊन बंदूक आमच्यावर रोखली. आम्ही अवाक झालो. आम्हाला शब्द सुचेनात. तो पुन्हा ओरडला, ‘कौन है?’ आणि चापाला हात घातला. आता मात्र आम्ही घाबरलो आणि पटकन् मी बोललो, ‘साहबसे मिलना है.’ मग तो सरळ उभा राहिला. बंदूक पूर्वपदावर ठेवली.
पवारसाहेब तालुक्याला गेलेत असे आम्हाला सांगितले गेले. आम्ही निरोप ठेवला आणि जीपकडे चालत निघालो. ॲड. गायकवाड नेहमीच्या शांतपणे म्हणाले, ‘‘त्या पोलिसाने तिसऱ्यांदा विचारले असते ‘कौन है’ आणि आपण काही बोललो नसतो, तर त्याला समोरच्याला शूट करण्याच्या ऑर्डर आहेत. ‘कौन है?’ विचारल्यानंतर आपण ‘दोस्त है’ असे म्हणायचे असते. शस्त्रास्त्राच्या ठिकाणी हा नियमच आहे.’’ ‘मग तुम्ही का बोलला नाही?’ अविनाशने विचारले. ‘मला आठवलंच नाही’ गायकवाड शांतपणे म्हणाले. गायकवाड निष्णात वकील. काही वर्षे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून राहिलेले. त्यांच्याजवळ ही समयसूचकता का नव्हती?
साधारणतः १९९७-१९९८ च्या आसपासची ही गोष्ट आहे. रविवारचा दिवस होता. त्या वेळी मी चेंबूरला शेल कॉलनीत राहत होतो. माझी पत्नी बाजाराला गेली होती. तासाभरात घरातील फोनची घंटी वाजली. समोरून पत्नी बोलत होती. ‘लवकर या, मी नेहरूनगर पोलिस स्टेशनमध्ये आहे.’ आमच्या शेल कॉलनीतून कामगारनगर येथे जायला एक पायवाट होती. तिथे ये-जा कमीच असायची. बाजारातून परतताना एका तरुणाने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिच्या गळ्यातले मंगळसूत्र खेचून पळून गेला होता.
तिने आरडाओरड केली; पण आजूबाजूला कोणीच नव्हते. मी पोलिस स्टेशनला गेलो. रीतसर तक्रार नोंदविली. तिथला सीनिअर मला ओळखत होता. त्याने मला तातडीने शोध घेतो असे सांगितले. मी बाजूला असलेल्या वस्तीतील लोकांशी बोललो. पण हाती काही लागले नाही. हा प्रकार पत्नीने जास्तच मनावर घेतला होता. मंगळसूत्र बऱ्यापैकी वजनदार होते.
दरम्यान, पोलिस स्टेशनला दोन-तीनदा फोन झाला होता; पण पत्नीचा तगादा सुरूच होता. ‘हे पुढारपण काय कामाचं’ अशा पद्धतीचे शेरेही ऐकविले जात होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भारिप-बहुजन महासंघा’च्या कोअर ग्रुपची मीटिंग दादरला आंबेडकर भवन येथे आयोजित केली होती. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची पार्श्वभूमी होती रिपब्लिकन-काँग्रेस जागावाटपाबाबत बोलणी चालू होती. प्रामुख्याने मी, मखराम पवार आणि शरद पवार जागावाटपाच्या बैठकीत असायचो. तसे ते फार गुंतागुंतीचे नव्हते. रिपब्लिकन ऐक्याचे चारही उमेदवार लोकसभेला निवडून आले. पक्षाला निवडणूक आयोगाकडे मान्यता मिळून ‘उगवता सूर्य’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते, तर ही बैठक आटोपून मी मंगळसूत्राच्या चौकशीसाठी नेहरूनगर पोलिस ठाण्याला जायला निघालो.
पक्षातील सहकारी मुरलीधर जाधव, रणजित मेश्राम यांनी मला थांबण्याचा आग्रह केला आणि म्हणाले, ‘अरे, पोलिसांचा बॉस आपला मित्र आहे. त्याच्याकडे जाऊ.’ त्या वेळी गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री होते. मुंडे आणि आम्ही ‘पुलोद’मध्ये एकत्र काम केले होते. मंडल आयोग, नामांतराचा लढा यात मुंडे यांनी घेतलेली भूमिका यामुळे आंबेडकरी चळवळीशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. बाळासाहेब विखे, संभाजीराव काकडे, बी. जी. कोळसे-पाटील, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब आंबेडकर, कधी-कधी कॉ. माधवराव गायकवाड यांचा एक ग्रुप होता.स्पष्टच बोलायचे तर शरद पवार यांच्या राजकारणविरोधी हा ग्रुप होता.
मी व मुरली आल्याचे कळाल्यावर मुंडे त्यांच्या केबिनमध्ये आले. मी त्यांना हकिगत सांगितली. त्यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात फोन केला. आम्ही जायला निघालो. त्यांनी थांबविले आणि बैठकीच्या खोलीत नेले. बघतो तर आत चक्क पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर बसलेले. आमची अटलजींशी ओळख करून दिली. विशेषतः मी कवी आहे हे त्यांना आवर्जून सांगितले. साधारणतः आम्ही सात ते आठ मिनिटे तिथे होतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीचा माहोल अजिबात नव्हता. बाहेर पडल्यावर तिथे ‘एन्रॉन’चे तत्कालीन सीईओ संजीव खांडेकर आणि भटनागर नावाचे ‘एन्रॉन’चे अधिकारी भेटीसाठी थांबले होते.
दुसऱ्या दिवशी बहुतेक वर्तमानपत्रांत बातमी ‘डांगळे-वाजपेयी भेट.’ शरद पवारांनी बाळासाहेब आंबेडकरांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली. आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे मला ‘ट्रोल’ केले गेले. लोकसभा निवडणूक प्रचारात भाग घ्यायचा नाही हा निर्णय घेऊन मी घरात बसलो. पंतप्रधान अटलजी तिथे असतील याची कल्पना नव्हती हे मला मान्य आहे; पण निवडणुकांच्या काळात माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याने विरोधी पक्षातील नेत्यांना भेटणे योग्य नव्हते ही खंत मनात अजूनही आहे. ही समयसूचकता माझ्या ठायी त्या वेळी का नव्हती?