Nanded
Nanded 
विश्लेषण

नांदेडला विरोधी पक्षनेतेपदावरून अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना हादरा  

अभय कुळकजाईकर

नांदेड :  नांदेड महापालिकेत भाजपमध्ये फूट पाडून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना आणखी एक हादरा दिला आहे . 

नांदेड महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अखेर तब्बल दहा महिन्यानंतर भाजपच्या नगरसेविका गुरुप्रितकौर सोडी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेत ८१ पैकी फक्त सहा नगरसेवक भाजपचे आहेत .

सहापैकी गुरुप्रितकौर सोडी एकट्याच सभेला उपस्थित होत्या. बाकीचे पाच नगरसेवक चिखलीकर समर्थक असून ते गैरहजर राहिले . हे पाच जण का गैरहजर राहिले याविषयी चर्चा आहे . 

 कॉंग्रेसच्या उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी भाजपच्या नगरसेविका गुरुप्रितकौर सोडी   यांची एकमताने निवड केली. याचा अर्थ  भाजपच्या नगरसेविका गुरुप्रितकौर सोडी यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला असा अर्थ घेतला जात आहे .  या घटनेनंतर जिल्ह्यात भाजपमध्ये  नवीन आणि जुने असा वाद होत असून नेत्यांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले आहे. 

नांदेड हा तसा कॉंग्रेसचा म्हणजेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला. मागील २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही चव्हाण यांनी तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. महाराष्ट्र ४८ पैकी दोन जागा कॉंग्रेसला मिळाल्या त्यामध्ये एक नांदेड आणि दुसरी हिंगोली (अॅड. राजीव सातव). त्यानंतर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांच्याकडे आले. भाजपने खूप जोर लावूनही  भाजपला  नांदेड महापालिका निवडणुकीत यश मिळाले नाही .  कॉंग्रेसला जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि नांदेड महापालिकेतही यश मिळाले. 

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपसोबत घेऊन जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण त्यातही कॉंग्रेसने जंबो यश मिळवले आणि ८१ पैकी ७३ जागा कॉंग्रेसने पटकाविल्या. भाजपला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. एक जागा शिवसेना व एक जागा अपक्षाला मिळाली.

ज्या प्रमाणे दिल्लीत संसदेत कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही त्याचप्रमाणे आता नांदेडमध्ये भाजपला महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळू द्यायचे नाही, असा चंगच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बांधला होता. त्यानुसार आक्टोंबर २०१७ मध्ये निवडणुका होऊनही दहा महिने काँग्रेसने  विरोधी पक्षनेतेपद  विविध कारणे देत भाजपला दिलेच नव्हते . 

भाजपच्या गुरुप्रितकौर सोडी यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे पत्र भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी दिले. त्याबाबत सर्वांचे एकमत होते. मात्र निवड झालीच नाही. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवापर्यंत प्रकरण गेले. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेसमोर प्रशासनातर्फे ठेवण्यात आला. 

दरम्यान, भाजपच्या सहा पैकी पाच नगरसेवक हे आमदार चिखलीकर गटाचे असून त्यांच्यापैकी एकाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे असा त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न होता .   माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांची  विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, अशी मागणी महापौरांकडे भाजपने एका निवेदनाद्वारे केली होती . त्यामुळे भाजपात अंतर्गत संघर्ष असल्याचे उघड झाले. त्याचा फायदा कॉंग्रेसने घेतला आणि चिखलीकर समर्थकांना या निमित्ताने पुन्हा एकदा धोबीपछाड देत कॉंग्रेसने त्यांच्यातील विरोधी गटात असलेल्या सोडींना विरोधी पक्षनेतेपद दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT