Rahul Narwekar and Uddhav Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Leader Of Opposition: ...तेच राहुल नार्वेकर उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार? 'विरोधी पक्षनेते'पदाचा निकाल सहजासहजी थोडाच लावणार..?

Rahul Narwekar Vs Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधवांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. सुरुवातीला हे पद आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल,अशी चर्चा रंगली होती. मात्र,आमदार भास्कर जाधव यांनी मध्यंतरी आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्रासारख्या राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही विरोधकांना जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले. पण तरीही या तीनही पक्षांमिळूनही विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारा आकडा गाठण्यात आघाडी यशस्वी ठरली नाही. तरीही आघाडीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं या विरोधी पक्षनेतेपदासाठी मित्रपक्षांवर दबावतंत्र वापरत आपल्या नेत्याचं नावही जाहीर करुन टाकलं. पण आता त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारकडून सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार असल्याचे संकेत दिले गेले होते. यानंतर महाविकास आघाडीत विरोधीपक्षनेतेपदासाठी हालचालींना वेग आला आहे. तसेच हे पद महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा 20 जागा निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. पण आता यात मोठा ट्विस्ट आला असून विरोधी पक्षनेतेपदासाठीची निवडणूकच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडेच विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार आहे. तसेच विरोधी पक्षांना हे पद द्यायचं की नाही याचाही ही निर्णय तेच घेणार आहेत. पण विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील पक्षाला त्यातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याआधी ते कठोरात कठोर ऐतिहासिक संदर्भ तपासण्याची शक्यता आहे.

तसेच या पदासाठी विधानसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के संख्याबळ विरोधी पक्षांकडे असणं आवश्यक असल्याबाबतचा नियमही चर्चेत आहे. मात्र,याबाबतचा नियम शिथील करण्याबाबत काही तरतूद आहे का, अशा अपवादा‍त्मक परिस्थितीत यापूर्वी काही निर्णय घेण्यात आले होते का, याविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर इतक्या घाईगडबडीत निर्णय घेण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड सरपंच हत्या,सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू,मंत्री जयकुमार गोरेंवर महिलेचे गंभीर आरोप,स्वारगेट बलात्कार प्रकरण यांसारख्या अनेक एकापाठोपाठच्या धक्कादायक घटनांनी आधीच गोत्यात आलेलं महायुती सरकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद अशा कसोटीच्या काळात इतक्या सहजपणे देईल याबाबत साशंकता आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विधानसभेत सर्वाधिक वीस जागा आहेत,त्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार हे निश्चित मानले जात होते.त्यानुसार ते जाणार आहे. मात्र,अडीच वर्षे मिळणार की संपूर्ण पाच वर्षे याबाबत महाविकास आघाडीत पडद्यामागं जोरदार हालचाली सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी ठामपणे अडीच वर्षांची चर्चा फेटाळून लावली असली तरी विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे,तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाणार असं समीकरणं महाविकास आघाडीत ठरल्याचं पुढे येत आहे.

विधानसभा शिवसेनेकडे,तर विधान परिषद काँग्रेसकडे मग आपल्याकडे काय, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अडीच वर्षे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी केली आहे.राष्ट्रवादीकडून असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.तसेच असा प्रस्ताव आलाच तर बघू असेही ते म्हटले होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा, ठाकरे गटाच्या बंडखोर 13 आमदारांवरच्या अपात्रतेच्या कारवाई केल्याप्रकरणी सुनावणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच त्यांनी एकनाथ शिदेंच्या गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह बहाल करताना आमदारांना अपात्रही ठरवलं नव्हतं.हा एकप्रकारे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला गेला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटाकडून नार्वेकरांवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली होती. तेच नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहजरित्या विरोधी पक्षनेतेपद देतील याविषयी शंकाच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद न देत नार्वेकर पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधवांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. सुरुवातीला हे पद आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल,अशी चर्चा रंगली होती. मात्र,आमदार भास्कर जाधव यांनी मध्यंतरी आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर जाधव यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT