Devendra Fadanavis - Uddhav Thakrey
Devendra Fadanavis - Uddhav Thakrey 
विश्लेषण

'वर्षा' आणि 'मातोश्री' वर नाराजीनाट्याचे प्रयोग!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विनोद तावडे, प्रकाश महेता, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे अशा आजी-माजी मंत्र्यांची नावे पहिल्या यादीत नसल्याने भाजपमध्ये दिल्लीच्या धक्‍कातंत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्याची तीव्र प्रतिक्रिया पुण्यात उमटली असून, नाराजांनी दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली आहे. बाहेरून आलेल्या आमदारांना; तसेच बड्या नेत्यांना तिकिटे दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काल 'वर्षा'; तसेच प्रदेश कार्यालयात गर्दी केली होती.

नाशिक येथे बाळासाहेब सानप यांना तिकीट दिले जाणार काय, याबद्दल दोन मते असल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे. नागपुरात शहर अध्यक्ष राहिलेल्या सुधाकर कोहळे यांची आमदारकीची संधीही गेल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. तेथे मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली. मुलुंड येथे सातत्याने निवडून येणाऱ्या तारासिंग यांचे वय 75च्यावर गेल्याने त्यांच्याजागी मिहीर कोटेचा यांना संधी मिळाली. आयारामांना मिळालेल्या संधीमुळे कार्यकर्ता नाराज आहे. त्यांनी ठिकठिकाणी रोष नोंदवला. 

शिवसेनेत विनोद घोसाळकर यांना मुंबईबाहेर पाठवले गेले तर तृप्ती सावंत यांना बांद्य्रातून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. काल रात्री उशिरापर्यंत एबी फॉर्म बदला, असे सांगणाऱ्या शिवसैनिकांची 'मातोश्री'वर गर्दी होती. हा राग कार्यालयाबाहेर जाऊ नये, याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षात तिकीटवाटपानंतर नाराजीनाट्याच्या लाटा उसळल्या आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील उमेदवारीला 'आम्हाला पुण्याचाच उमेदवार पाहिजे'च्या फलकाने विरोध करण्यापासून सर्वदूर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी नोंदवली. मेधा कुलकर्णींनाच पुन्हा संधी द्या, या मागणीने पुणेकर विरोध नोंदवत आहेत. कोल्हापुरात जिंकून येणे अशक्‍य असल्याने ते पुण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्याऐवजी महापालिकेत उत्तम कामगिरी बजावणारे मकरंद नार्वेकर किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील राहुल नार्वेकर यांचा विचार होणार आहे असे समजते.

भाजपतील आयात उमेदवार : शिवेंद्रराज भोसले (सातारा), संदीप नाईक (ऐरोली) वैभव पिचड (अकोले) राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), जयकुमार गोरे (माण), राणा जगजितसिंग (तुळजापूर), कालिदास कोळंबकर (वडाळा), मदन भोसले (वाई).
शिवसेनेचे आयात उमेदवार : अब्दुल सत्तार (सिल्लोड), निर्मला गावित (इगतपुरी), संग्राम कुपेकर (चंदगड), भास्कर जाधव (गुहागर).
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT