मुंबई : देशभरात प्रसिद्ध असेलले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांना हॅकरनी दणका दिला असून, त्यांचे अधिकृत फेसबुक पेज (Facebok Pag) हॅक करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) असलेल्या लांडे यांनी स्वत:च याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. लांडे यांची लोकप्रियता मोठी असल्याने फेसबुकवर त्यांचे साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर आहेत.
शिवदीप लांडे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे. या या हॅकरकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने लांडेनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवर माझे साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी माझे पेज हॅक केले आहे. माझ्या पेजचे अॅडमिन मनजित विशाल हे आहेत. माझे पेज 19 ऑगस्टला हॅक झाले. हॅकरनी विशाल यांना अॅडमिन म्हणून काढून टाकले आहे. आता माझे पेज फेसबुकवर दिसत नाही.
मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील असलेले शिवदीप लांडे हे बिहार केडरचे 2006 च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रात ते प्रतिनियुक्तीवर आले आहेत. त्यांना महाराष्ट्रात जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर जसे पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा छोट्या शहरांच्या आयुक्त पदावर नेमले जाईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांना सुरवातीला अमली पदार्थ विरोधी पथकात नेमण्यात आले. नंतर त्यांची तेथून दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे.
लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग ही नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटण्याच्या अधीक्षकपदी त्यांची नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चुकारांना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला. लाच घेणाऱ्या पोलिसाला स्वतःच वेष बदलून पकडून दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही त्यांना मोकळीक दिली होती. अशा अनेक बाबींमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रातही अशा रीतीने त्यांना या पद्धतीने काम करता येईल, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्रात त्यांची पोस्टिंग जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर झाली नाही.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई असलेले लांडे गेली तीन वर्षे महाराष्ट्रात आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना साधारणपणे पाच वर्षांपर्यंत आपल्या मूळ राज्यात प्रतिनियुक्तीवर जाता येते. हा कालावधी आणखी एक वर्षानेही वाढवता येतो. अकोला जिल्ह्यातील परसा हे त्यांचे मूळ गाव आहे. खडतर परिस्थितीतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यानंतर त्यांची 2006 मध्ये आयपीएस म्हणून निवड झाली आणि त्यांना बिहार केडर मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.