Raj Thackeray-Sharad Pawar
Raj Thackeray-Sharad Pawar sarkarnama
विश्लेषण

तुम्हाला आश्चर्य वाटेल.. पण राज ठाकरेंचे हे स्क्रिप्ट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे!

Yogesh Kute

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal bihari Vajpayee) यांच्या हस्ते 2004 च्या सुरवातीच्या सुमारास पार पडले. त्या आधी महाराष्ट्रात जेम्स लेनच्या पुस्तकावरून महाराष्ट्रात वादळ उठले होते. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. या पुतळ्याच्या कार्यक्रमात वाजपेयी यांनी एक विधान केले होते. `विचारांचा सामना विचारांनी करायला हवा. कोणत्याही पुस्तकावर बंदी घालणे अयोग्य आहे,`असे ते वाक्य होते. पण या एका वाक्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने रान उठवले होते, याची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनच्या पुस्तकालाच पंतप्रधानांचा आणि त्या वेळी व्यासपीठावर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पाठिंबा असल्याचा दावा यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने (NCP) केला.

वाजपेयी यांच्या या कार्यक्रमानंतर पुण्यातील खराडी परिसरात शरद पवार (Sharad Pawar) यांची दोन-तीन दिवसांनी सभा झाली आणि महापुरूषांना कमीपणा आणणाऱ्या विचारांची भलावण पंतप्रधान करत आहेत, असा आरोप पवार यांनी सभेत केला आणि तेथून जेम्स लेन हा प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काॅंग्रेसने बनवला. आर. आर. पाटील यांनी मग आक्रमक भाषण करत हा मुद्दा आणखी पेटवला. मराठा मतांचे `कन्साॅलिडेशन` राष्ट्रवादीच्या बाजूने झाले. लोकसभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसला फारशा चांगल्या जागा मिळाल्या नाहीत. पण भाजपच्या चुकलेल्या लेनमुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला.

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सलग तीन झालेली भाषणे. या तीनही भाषणांत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला लक्ष्य केले. प्रति बाळासाहेब ठाकरे ठरविण्यासाठी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय हाती घेतला. बाळासाहेबांसारखी शाल पांघरली. त्यांना काही उत्साही मंडळींनी हिंदू जननायक असा किताबही दिला. ठाकरे हे भाजपच्या हिंदुत्वाची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही झाला. शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ झाले म्हणून आक्रमक स्वरुपातील हिंदुत्व सादर करण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. हिंदूंचे नेते म्हणून पुढे येण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. काॅंग्रेसच्या मांडिला मांडी लावून बसल्याने शिवसेनेचा नाराज झालेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार त्यांना आपल्याकडे ओढायचा आहे. त्यासाठी त्यांनी सलग तीन सभांतून त्यासंबंधीचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रयत्नांत मात्र त्यांनी हिंदू-मुस्लीम असा संघर्ष उभा करतानाचा ब्राह्मण-ब्राह्मणेतर (मराठा) असाही वाद सुरू केला आहे.

समर्थ रामदास, लोकमान्य टिळक, बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन अशी सारे नावे एकाच भाषणात घेऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस ज्या विचारांना विरोध करते त्याचेच समर्थन राज यांनी केले. एवढेच नाही तर शरद पवार हे जातियवादी म्हणून त्यांच्यावर तीनही सभांत कठोर टीका केली. पवारांवर अशी टीका खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही केली नव्हती. पण याचा सारा तोटा राज यांना होऊ शकतो आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला त्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता वाढू शकते.

हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा तयार करताना राज हे इतिहासातील वादग्रस्त मुद्दे उपस्थित करत आहेत. जेम्स लेनने जे लिहिले ते कोणालाच मान्य होऊ शकत नाही. तो संपलेला मुद्दा राज यांनी विनाकारण उकरून काढला. त्यातही ज्या घटनांबद्दल वाद आहे अशांनाही हात घातला. समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू असण्याचे मानणे, हे पण नव्याने झालेल्या संशोधनात मान्य झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा फुले यांनी शोधलेली असताना राज यांनी लोकमान्य टिळकांना त्याचे श्रेय औरंगाबादच्या सभेत बोलताना दिले, असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. हा इतिहास मान्य नसलेल्यांना राज यांनी अंगावर ओढून घेतले आहे.

त्यांचे हे मुद्दे खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते तयारीने उतरले नाही तरच नवल. त्यामुळे पुन्हा मराठा आणि इतर ओबीसी हे राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या संपल्यानंतर अनेक मराठा संघटनांना काम उरले नव्हते. ते काम राज ठाकरे यांनी मिळवून दिले. आता छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे ओबीसी नेतेही राज यांच्याविरोधात आक्रमकपणे उतरले आहेत. राष्ट्रवादी सत्तेत असलेल्या सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा सांगण्यापेक्षा राज हे चुकीचा इतिहास मांडत आहेत, हे सांगणे सत्ताधाऱ्यांसाठी केव्हाही सोपे आहे. राज जो भावनात्मक मुद्दा मांडत आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीलाही संधी आता मिळाली आहे.

दुसरी गोष्ट शरद पवार यांना सतत टार्गेट करणे, ही बाब नेहमीच फायदेशीर ठरलेली नाही. गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी केलेला हा प्रयोग देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये पुन्हा करून पाहिला. त्यात त्यांना यश मिळाले नाही. उलट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जास्त स्फुरण चढले. आपला नेता अडचणीत आहे, असा मेसेज गेला आणि भाजपला त्याचा तोटा झाला. आता राज ठाकरे पुन्हा फडणवीस यांच्याच प्रयत्नांची पुनरावृत्ती करत आहेत. पण ते जेवढे शरद पवारांना टार्गेट करतील, तितका त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

राज यांनी ही लाईन बदलली नाही तर हिंदू जननायक होण्याआधीच मराठा आणि काही ओबीसी हे त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात. राष्ट्रवादीला ते सरळ पाठिंबा देऊन मोकळे होतील. म्हणूनच राज ठाकरे यांचे हे स्क्रिप्ट राष्ट्रवादीच्या फायद्याचे वाटते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT