पाथर्डी (जि. नगर) : ज्या विधानभवनात लोकांच्या प्रश्नांसाठी पत्रके फेकली, त्याच विधानभवनाचे सदस्यत्व मिळवून बबनराव ढाकणे यांनी दुष्काळी भागाचा विकास केला. पाथर्डी तालुक्याचा विकास करताना वांबोरी चारी व ऊसतोडणीच्या प्रश्नांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, असे गौरवोदगार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ढाकणे यांचे कौतुक करताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. थोडाच वेळ झालेल्या भाषणातून पवार यांनी राजकीय षटकार न मारता ढाकणे यांचेच कौतुक केले. पवार म्हणाले, की स्वतःच्या कर्तृत्त्वावर ढाकणे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. विधानभवनात त्यांनी केलेली भाषणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ अद्यापही आहे. या वयातही त्यांच्या बोलण्यातून सर्वसामान्यांची तळमळ दिसून येते. अशा अवलिया माणसाचा गौरव होणे म्हणजे नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याला मिळावे, म्हणून त्यांचे प्रयत्न जनतेला माहिती आहेत. पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळण्यासाठी ढाकणे यांची तळमळ महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती खटकली
कार्यक्रमाला शक्तीप्रदर्शन व्हावे, म्हणून ऍड. प्रतापराव ढाकणे यांनी जोरदार तयारी केली. नियोजनात कुठे कमी राहून नये, म्हणून मागील महिनाभर स्वतः उभे राहून कामे करून घेतली. शरद पवार आले, पण मुख्यमंत्री न आल्यामुळे या तयारीच्या कामावर विरजण पडले. निमंत्रण स्विकारूनही मुख्यमंत्री न आल्याने त्यांची अनुपस्थिती ऍड. ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांना खटकली. मुख्यमंत्री न आल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे भाजपनेचे नेते आले नाहीत. त्यामुळे भाजपचे तालुक्यातील कार्यकर्तेही आले नाहीत. त्यामुळे ढाकणे यांचे जुने कार्यकर्ते नाराज दिसत होते.
प्रत्येक गावातून हजेरी
ढाकणे यांच्या गौरव सोहळ्याला तालुक्यातील प्रत्येक गावातून ग्रामस्थांची हजेरी होती. ढाकणे यांचे जुने स्नेही काठीचा आधार घेऊन उपस्थित होते. ते आपल्या मित्रांशी गप्पा मारताना ढाकणे यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. ऍड. प्रताप ढाकणे यांनी राजकारणात चांगल्या पद्धतीने सक्रीय होऊन बबनराव ढाकणे यांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करीत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.