Shashank Rao Raj-Uddhav Thackeray  sarkarnama
विश्लेषण

BEST Election Result : अंगावरचा गुलाल निघण्याआधीच बेस्ट कर्मचाऱ्यांना धक्का? शशांक राव तर ‘स्टार प्रचारक’…

Shashank Rao union won election : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या कामगार संघटनेला 21 पैकी 14 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आशिष शेलार यांनी राव हे महापालिका निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असतील, अशी घोषणा केली आहे.

Rajanand More

BMC Election Politics : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजून काही महिने बाकी आहे. पण बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये त्याचे रणशिंग फुंकले गेले, असे दावे-प्रतिदावे विविध पक्ष-संघटनांकडून केले जात आहेत. जेमतेम 15 हजार सभासद संख्या असलेल्या पतपेढीची निवडणूक अडीच-तीन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील दिशा कशी ठरवणार, हा प्रश्नच आहे. पण असो, राजकारण करायचेच म्हटले तर त्याला काही मर्यादा नाही. पण बेस्ट निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्याविषयी सेट करण्यात आलेले नॅरेटिव्ह आणि त्यानंतर काही तासांतच उघडकीस आलेला सगळा राजकीय खेळ राव यांना पाठिंबा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धक्काच म्हणावा लागेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

मागील नऊ वर्षांपासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स यूनियनने धूळ चारली. त्यांच्या संघटनेला पतपेढीच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा मिळाल्या. तर प्रसाद लाड यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या महायुतीच्या पॅनेलला सात जागा. पण ठाकरेंची सेना आणि मनसेप्रणित उत्कर्ष पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. कामगार संघटनेतील ठाकरेंच्या वर्चस्वाला हा मोठा धक्काच आहे. खरेतर बाळासाहेब ठाकरे असतानाही बेस्टमध्ये काहीवेळा सेनेचा विजयापासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे ठाकरेंचा पराभव काही पहिल्यांदा होत नाही. पण यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यामुळे या पराभवाची चर्चा तर होणारच.

निवडणुकीत ठाकरेंचा उत्कर्ष पॅनेल आणि प्रसाद लाड यांच्या पॅनेलमध्येच खरी लढत, असे चित्र उभे केले जात होते. पण शरद राव यांचे पुत्र असलेल्या शशांक राव यांनी राजकीय पक्ष विरहीत संघटनेची पतपेढी सत्ता असावी, असा नॅरेटिव तयार केला आणि तोच अजेंडा घेऊन त्यांनी कामगारांचा विश्वासही संपादन केले. त्यांच्या बाजूला प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष, नेता, पैसा काहीच नव्हता. होता तो फक्त राजकीय पक्ष विरहीत नॅरेटिव आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या कामगारांसाठी केलेल्या कौतुकास्पद कामाचा अजेंडा. त्याच भरवशावर त्यांनी निवड़णुकीत घसघसीत मतेही मिळवली.

शशांक राव यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता निवडणूक लढवली असली तरी ते भाजपचेच आहेत, हे विसरून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारांचा मुंबईत प्रचारही केला. भाजपच्या सभासद नोंदणी अभियानातही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे तसे ते भाजपचे सक्रीय कार्यकर्ते म्हणता येतील. पण पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे बॅनर लावले नाही. स्वतंत्र कामगार नेता म्हणूनच त्यांनी ही निवडणूक लढवली. दुसरीकडे प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने पॅनेल तयार केले. पण हे पॅनेल म्हणजे शशांक राव यांची पक्षविरहित प्रतिमा तयार करण्यासाठी किंबहुना कर्मचाऱ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी केलेली राजकीय खेळीच होती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजपचे बडे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनीच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेलार यांनी निकालानंतर काही तासांतच शशांक राव आणि प्रसाद लाड हे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक असतील, अशी घोषणा करून टाकली आहे. ही घोषणा म्हणजेच पतपेढीवर शशांक राव यांना पाठिंबा देणाऱ्या कामगारांच्या यूनियनची सत्ता नसेल तर भाजपची असेल, याचे सुतोवाच आहे. पक्षविरहित पतपढीचे शशांक राव यांनी दाखविलेले स्वप्न विजयाचा गुलाल अंगावरून निघण्याआधीच भंगले का, असा प्रश्न कामगारांना पडल्यास नवल वाटायला नको. शशांक राव हे भाजपचेच होते आणि राहतील, हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत सेट करण्यात आलेल्या नॅरेटिवचाही पर्दाफाश झाल्याची चर्चा आहे.

शशांक राव यांनी कामगारांसाठी केलेले काम कौतुकास्पद असेच आहे. त्यांनी कामगारांच्या हितासाठी अनेक लढे उभारले, आंदोलने केली. संप यशस्वी करून दाखविले. कामगारांना विविध फायदे मिळावेत, यासाठी प्रशासन, सरकारशी लढले. त्यामुळेच आज कामगारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. पण विश्वासाला शेलारांच्या घोषणेने काहीसा तडा गेला आहे. कामगारांच्या विश्वास डळमळीत होऊ नये, यासाठी शशांक राव यांना बेस्टमध्ये यापुढेही पक्षविरहित काम करावे लागेल. राव यांना पाठिंबा देणारे कामगार केवळ त्यांच्याच यूनियनचे नाहीत. ठाकरेंच्या संघटनेतील कामगारांनीही राव यांच्यासाठी क्रॉस वोटिंग केले, अशी चर्चा आहे. त्यांनी मतदान करताना पक्षाचा नव्हे तर कामगारांच्या हिताचा विचार केला असेल. तेच हित शशांक राव यांनाही जपावे लागणार आहे. कामगारांचे स्टार प्रचारक म्हणून सेट झालेले नॅरेटिव कायम ठेवावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT