in bihar 61 percent people say bjp and ljp have a secret deal
in bihar 61 percent people say bjp and ljp have a secret deal  
विश्लेषण

बिहारमधील 61 टक्के जनता म्हणतेय भाजप अन् चिराग पासवानांची छुपी युती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडले आहेत. याचवेळी त्यांनी केंद्रात एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. आता एका ताज्या सर्वेक्षणातून बिहारमधील 61 टक्के जनतेलाही हेच वाटत असल्याचे समोर आले आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) लक्ष्य करीत आहेत.

चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत मोदींसोबत राहू, असे चिराग जाहीरपणे बोलत आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. 

या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये 'सी व्होटर'ने सर्वेक्षण केले आहे. भाजप आणि एलजेपी यांची छुपी युती आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर 61 टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले. याचवेळी 39 टक्के नागरिकांनी नाही उत्तर दिले आहे. उत्तर बिहारमध्ये 58.4 टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले आहे तर पूर्व बिहारमध्ये होय उत्तर देणाऱ्या नागरिकांची संख्या 63 टक्के आहे. 

चिराग पासवान यांनी बिहारमध्ये स्वंतत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे ते पंतप्रधान मोदींचे कौतुक करीत निवडणुकीनंतर आघाडी स्थापन करण्याचा दावा करीत आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असे वाटते का? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. यावर 57.5 टक्के नागरिकांना होय उत्तर दिले आहे. याचवेळी 42.3 टक्के नागरिकांनी नाही उत्तर दिले आहे. 

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत बोलताना दिवंगत सहकारी रामविलास पासवान  यांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला होता. मात्र, पासवान यांचे पुत्र चिराग यांच्याबाबत मोदींनी सूचक मौन पाळले आहे. आगामी सत्तासमीकरणे डोळ्यासमोर ठेवून मोदींना ही खेळी खेळल्याची चर्चा सुरू आहे. एनडीएपासून फारकत घेणाऱ्या चिराग यांच्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या संयुक्त जनला दलातील अस्वस्थता मात्र, वाढली आहे. 

मोदींनी नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत चिराग यांचा उल्लेख टाळून वेळ मारून नेली होती. कारण चिराग यांच्यावर जाहीरपणे टीका केल्यास ते विरोधी पक्षांकडे झुकण्याची शक्यता आहे. याचबरोबर निवडणूक निकालानंतर नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यासारखी परस्थिती निर्माण झाल्यास चिराग हे भाजपचे हुकुमाचे एक्का असतील.

चिराग यांच्या एलजेपीमध्ये भाजपचे अनेक बंडखोर नेते दाखल झाले आहेत. निकालानंतर हे नेते पुन्हा भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचवेळी चिराग हे जेडीयूच्या विरोधात उमेदवार देत आहेत आणि भाजपला पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत चिराग यांचा भाजपला तोट्यापेक्षा फायद्याच अधिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT