Key Takeaways From the Latest Bihar Assembly Election Outcome : बिहार विधानसभा निवडणुकीमध्य एनडीएला ऐतिहासिक विजय मिळण्याची चिन्हे आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएने दोन तृतियांश बहुमताचा आकडा पार केला असून महाआघाडीला सपाटून मार खावा लागला आहे. या निकालाने एक्झिट पोलचे अंदाजही खोटे ठरवले आहे. निकालाची वैशिष्ट्ये म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असली तरी मोदीलाट चालली, असे म्हणता येणार नाही. या निवडणुकीत एक फॅक्टर सबसे बडा खिलाडी ठरला आहे.
बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रकृतीवरून विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रकारेच दावे केले जात होते. एवढेच नाही तर भाजपमधील काही नेत्यांकडून आपल्याच पक्षाकडे मुख्यमंत्रिपद राहावे, याबाबत प्रयत्नही केले जात होते. पण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावरील विश्वास कमी होऊ दिला नाही.
सध्याचे निकाल पाहता भाजपची रणनीती यशस्वी ठरली आहे. निवडणुकीत नितीश कुमार हा फॅक्टरच सबसे बडा खिलाडी ठरला आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची मागील निवडणुकीत पीछेहाट झाली होती. मागील निवडणुकीत जेडीयूला केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र पक्षाला जवळपास दुपट्ट जागा मिळताना दिसत आहे. नितीश कुमार यांचा राज्यात अजूनही करिष्मा कायम असल्याचे हे चित्र आहे.
मागील निवडणुकीत भाजपला ७४ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये या निवडणुकीत किंचित वाढ होताना दिसत आहे. याचा अर्ज पंतप्रधान मोदींचा करिष्मा यावेळच्या निवडणुकीतही कायम राहिला आहे. पण जेडीयूला मिळालेल्या घवघवीत यशामुळे त्यांचा करिष्मा झाकोळला गेल्याचे मानले जात आहे. त्यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार ठरले आहेत.
नितीश कुमार फॅक्टर
बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आपला करिष्मा कायम ठेवला आहे. निवडणुकीआधी त्यांच्या सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजना लोकप्रिय ठरल्याचे निकालावरून दिसते. तसेच युवक व इतर घटकांसाठी करण्यात आलेल्या घोषणांचाही त्यांना फायदा झाला. त्यांच्या प्रकृतीबाबत विरोधकांनी व्यक्त केलेली शंकाही बिहारच्या मतदारांनी धुडकावून लावली आहे. एक्झिट पोलचे आकडेही नितीश कुमार यांनी फोल ठरवले आहेत. त्यांच्या पक्षाला आश्चर्यकारक यश मिळताना दिसत आहे.
आघाडीची पीछेहाट
एनडीएला २०१० नंतर पहिल्यांदाच मोठा विजय मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाआघाडीची २०१० नंतर सर्वाधिक हाल झाले आहेत. मागील निवडणुकीत आरजेडी ७५ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण यावेळी या पक्षाला ५० चा आकडाही गाठता येणार नाही, असे सध्याच्या निकालावरून दिसते. त्याचप्रमाणे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या तर अस्तित्वाची लढाई असणार आहे. काँग्रसेला दुहेरी आकडा पार करणेही कठीण दिसत आहे.
मागील निवडणुकीतील स्थिती (कंसात सकाळी ११.४५ वाजताची आयोगाच्या संकेतस्थळावरील पक्षनिहाय आघाडी)
आरजेडी – ७५ (३४)
भाजप – ७४ (८५)
जेडीयू – ४३ (७६)
काँग्रेस – १९ (६)
डावे - १६ (८)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.