Vikhe-Harshwardhan Patil-Chitra Wagh
Vikhe-Harshwardhan Patil-Chitra Wagh Sarkarnama
विश्लेषण

राणे, विखे, हर्षवर्धन, वाघ यांना निवडणूक रचनेत स्थान नाही... भाजपसाठी अजून ते उपरेच?

ज्ञानेश सावंत

मंबई : आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने (Maharashtra BJP) पद्धतशीर पावले टाकण्यास सुरवात केली आहे. ठाकरे सरकाविरोधातील आवाज बुलंद करण्याच्या इराद्याने येत्या १५ एप्रिलपासून राज्य पिंजून काढण्यासाठी १२ नेत्यांची फौज उभारली. या बारा नेत्यांतील 11 जण हे मूळचे भाजपचे असलेले आहेत. मात्र बाहेरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना या निवडणूक तयारीसाठीच्या समितीत स्थान नाही. याला अपवाद विधान परिषदेतेली विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचाच आहे. दरेकर वगळता इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना जबाबजारी देण्यात आलेली नाही.

सरकारसह थेट ठाकरे घराण्यावर पंजा मारणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे किंवा पवार घराण्यावर आगपाखड करणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि शाब्दिक प्रहार करून सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणाऱ्या चित्रा वाघ यांना या कार्यक्रमापासून लांब ठेवल्याचे दिसून आले आहे. तसेच संघटन कौशल्यात आणि निवडणूक तयारीत नेहमीच तरबेज असलेले अनुभवी राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही या कोअर समितीतून दूर ठेवण्यात आले आहे. सध्या आघाडीवर तुटून पडणारे नेते हे इतर पक्षांतून आलेले असल्याने त्यांना स्थान न मिळणे, हे आश्चर्याचे मानले जात आहे.

भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी आणि ठाकरे सरकारच्या कारभाराची कुंडली जनतेसमोर मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना दोन जिल्हे देण्यात आले आहेत. भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारती या सर्व दौऱ्याचे समन्वय करणार आहेत. यात

१.देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर

२.चंद्रकांतदादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३.सुधीर मुनगंटिवार - बीड, जालना

४.पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

५.आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग

६. श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती

८. प्रविण दरेकर - पालघर, मिरा भाईंदर

९. गिरीश महाजन - उस्मानाबाद, हिंगोली

१०.संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११. रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण

१२. रावसाहेब दानवे - बुलढाणा, नंदूरबार

या प्रमाणे प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थात अद्याप काही जिल्ह्यांची जबाबदारी देणे बाकी असल्याने त्यात इतर नेत्यांना स्थान मिळू शकते.

हे दौरे संघटनात्मकदृष्ट्या महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे भाजपदेखील त्याकडे गंभीरतेने बघत आहे. खोत, पडळकर किंवा चित्रा वाघ यांना संघटनात्मक कामांत गुंतविण्याऐवजी त्यांनी रोज महाविकास आघाडीतील नेत्यांवर तोंडसुखच घ्यावे, अश रणनीती असू शकते. विखे आणि हर्षवर्धन पाटील यांना संघटनात्मक कामाची जबाबदारी देण्याऐवजी त्यांनी आपापले मतदारसंघच सांभाळावेत, असे तर यातून सुचवायचे असावे, असे एका भाजप नेत्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT