Jaykumar Gore, Sangram thopte, prithviraj patil And Jayant Patil sarkarnama
विश्लेषण

Jaykumar Gore : संग्राम थोपटे, पृथ्वीराज पाटलांचे मिशन फत्ते... मंत्री गोरेंची आता 'जयंत पाटलांसाठी' फिल्डिंग

Jaykumar Gore Offering BJP Entry to Jayant Patil, Vishal Patil : सध्या राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिकची हवा खेळत असून अनेक काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत महायुतीच्या वाटेवर जाताना दिसत आहेत. नुकताच पुणे आणि सांगली जिल्ह्यातही असे काही मोठे प्रवेश काँग्रेसमधून भाजपमध्ये झाले आहेत.

Aslam Shanedivan

Sangli News : जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वरचेवर हवा दिली जाते. कधी ही भाजपकडून तर कधी पाटील यांच्याच निकटवर्तीयांकडून या चर्चा घडवून आणल्या जातात. आताही गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी कारण ठरले ते मंत्री जयकुमार गोरे यांचे आमंत्रण. यापूर्वी भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रयत्न असल्याचे समोर आले होते. आता याच गोरे यांनी जयंत पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा सर्वच नेत्यांनी योग्य पद्धतीने वापर करून धेतला गणेश मंडळांना भेटी देवून मतपेरणी केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अपक्ष खासदार विशाल पाटील आणि भाजप नेते चंद्रकांत पाटीलही मागे नव्हते. अशातच महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावत नवी खेळी खेळली आहे.

जयकुमार गोरे यांनी, हरिदास पाटील यांच्या खांद्यावर बंदुक ठेवत जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली आहे. "हरिदास पाटील आणि माझी मैत्री राजकारणापलीकडची आहे. त्यामुळे ते सहजासहजी भाजपमध्ये येणार नाहीत. आता जयंत पाटील यांनीच भाजपमध्ये यावे म्हणजे हरिदासही येतील,’’ अशी खुली ऑफरच गोरे यांनी जयंत पाटील यांना दिली. त्यांनी जयंत पाटील यांच्यासह विशाल पाटील यांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

सगळ्या राजकीय कुरघोड्या पचवलेल्या आमदार जयंत पाटील यांनीही यावर टोला लगावला. "सांगलीवाडीचे लोक फार हुशार आहेत. ते कधीच होडी पलटवू देत नाहीत. पण या नदीतील होडीत खूप जण बसले आहेत. आपण आपला काठ न सोडलेला बरा. आता पृथ्वीराज पाटील देखील भाजपवासी झाले आहेत. कदाचित त्यांना खासदार विशाल पाटील यांनीच जायला सांगितले असावं असाच टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला.

यावर विशाल पाटील यांनी पलटवार करताना, हरिदास पाटील पाहुणे आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. पण ते आले नाहीत. ते जयंत पाटील यांच्याकडे गेले. आता मंत्री गोरे त्यांच्या कार्यक्रमाला आलेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार तर नाहीत ना? याचीच काळजी वाटत असल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावला.

थोपटे अन् पाटील यांचे मिशन फत्ते :

संग्राम थोपटे यांचा भाजपमधील प्रवेश सुकर करण्यासाठी जयकुमार गोरे आणि दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2019 च्या निवडणुकीपूर्वी देखील संग्राम थोपटे यांना राहुल कुल यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. तसेच प्राथमिक बैठका देखील पार पडल्या मात्र हा प्रवेश होऊ शकला नव्हता. त्यानंतरही भाजपसोबत या असा सल्ला त्यांना आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरे यांनी दिला होता.

असेच काहीसे सांगलीत देखील झाले होते. दोन विधासभेला पराभव पचवावा लागलेले पृथ्वीराज पाटील यांना देखील भाजपची ऑफर होती. त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात जयकुमार गोरे यांनी भूमिका बजावली होती. पण त्यांच्याआधीच भाजपमध्ये गेलेल्या जयश्री पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांचा विरोध होता. याविरोधामुळेच त्यांचा प्रवेश रखडला होता. मात्र जयकुमार गोरे यांनी नव्याने मांडणीकरत पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश करवून घेतला होता. ते या प्रवेशाला हजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT