BJP 

 

Sarkarnama

विश्लेषण

भाजप नेत्याची अशीही व्यथा..पक्षांतर केलं पण आमदारकीसोबत पेन्शनही गेली!

भाजप (BJP) आमदाराला (MLA) पक्ष सोडल्याचा चांगलाच फटका बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

आगरतळा : भाजप (BJP) आमदाराला (MLA) पक्ष सोडणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांना दोनच महिन्यांत आमदारकीवर पाणी सोडावे लागले आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या आमदाराला विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. विशेष म्हणजे आमदारकी गेल्यानंतर ते माजी आमदार म्हणून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनासह इतर फायद्यांनाही ते मुकले आहेत.

आशिष दास (Ashish Das) या नेत्याचे नाव आहे. त्यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. दास यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते 2018 मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्रिपुरातील (Triupura) धलाई जिल्ह्यातील सुरमा हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मागील वर्षी 31 ऑक्टोबरला तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपने त्यांना तातडीने पक्षांतरबंदी कायद्यानुसार नोटीस बजावली होती.

याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष रतन चक्रवर्ती म्हणाले की, आशिष दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ते निवडून आले त्या पक्षाऐवजी दुसऱ्याच पक्षाचे काम करीत होते. त्यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीला त्यांनी उत्तरही दिले नव्हते. घटनात्मक बाबी तपासून विधानसभेने दास यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे दास यांची आमदारकी गेली असली तरी माजी आमदार म्हणून मिळणारे कोणतेही लाभ त्यांना मिळणार नाहीत. याला कारण आहे त्रिपुरा विधानसभेने नोव्हेंबर 2021 मध्ये संमत केलेले विधेयक. या विधेयकानुसार 5 वर्षांचा पूर्ण कालावधी आमदाराने पूर्ण केलेला नसल्यास त्यांना निवृत्तीवेतनासह भत्ते आणि इतर सुविधा मिळणार नाहीत. या नव्या नियमाचा फटका बसलेले दास हे पहिलेच आमदार आहेत.

पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आता गोवा आणि त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. तृणमूलचे लक्ष प्रामुख्याने त्रिपुरावर आहे. त्यासाठी अनेक नेत्यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. तृणमूलने भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे काम सुरू केले आहे.

तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने राज्याचा दौरा करीत आहेत. त्यांनी नुकतेच आगरतळा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांना आव्हान दिले होते. भाजपचे सरकार आता राज्यात शेवटचे काही दिवस मोजत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पराभूत केले नाही, तर मी राजकारण सोडेन, बॅनर्जी यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT