bhaskar jadhav nitesh rane anil bonde.jpg sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : थिल्लर भाषा बोलणारे सुसाट; वय, पदाचेही भान सुटले

Maharashtra Political Leaders Controversy Statements : महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात थिल्लर भाषा वापरण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यांचे पक्षही त्यांना पाठिशी घालत आहेत. किंबहुना, पक्षाने त्यांना असे बोलण्यासाठीच ठेवले असावे, असे वाटते.

अय्यूब कादरी

सर्वपक्षीय राजकीय नेते समाज माध्यमांवरील थिल्लर भाषा बोलू लागले आहेत, ही बाब चिंताजनक तर आहेच, शिवाय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचे निदर्शक आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कुणीही याला अपवाद राहिलेले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. विरोधकांवर मानहानीकारक टिपण्णी करण्याची सुरुवात जरी भाजपच्या आयटी सेलने केली असली, तरी आता अन्य पक्षांचे आयटी सेल आणि नेतेही तोच कित्ता गिरवत आहेत.

वरील 50-60 शब्द वाचले की डोळ्यांसमोर सर्वात आधी नाव येते ते भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांचे! नितेश राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र. उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांवर टीका करताना नितेश राणे कधीच मर्यादा सोडली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचाही ते सातत्याने प्रयत्न करतात.

नितेश राणे यांच्यानंतर कोणाचे नाव येते? यासाठी मेंदूवर थोडा ताण द्यावा लागेल, कारण स्पर्धा तशी तीव्र आहे. पण हा मान जातो शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांना! भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरलेली भाषा, त्यांना लावलेली विशेषणे आक्षेपार्ह आहेत. कोणाच्याही शारीरिक रचनेवरून टीका-टिपण्णी करणे हे असुसंस्कृतपणाचेच लक्षण. मग ते जाधव असतील, राणे असतील की आणखी कुणी असतील.

भास्कर जाधव यांची क्रिया नव्हती, प्रतिक्रिया होती, असे काहीजण म्हणू शकतात. तरीही जाधव यांनी वापरलेल्या भाषेचे समर्थन करता येणार नाही. दुसऱ्या स्थानासाठी भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीही आता मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. भास्कर जाधव यांनी फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला, हे खरे आहे, पण ते धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा बोलत नाहीत, दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, हेही आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.

भाजपच्या आयटी सेलने राजकारणाचे, सक्षम विरोधी नेत्यांचे विकृतीकरण सुरू केले, हे कुणीही नाकारू शकत नाहीत. जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचीही भाजपच्या आयटी सेलने यथेच्छ बदनामी केली. महिला म्हणून सोनिया गांधी यांचाही आदर भाजप आयटी सेलला करता आला नाही. राहुल गांधी यांच्या बदनामीसाठी तर भाजपच्या आयटी सेलने दिवसरात्र एक केला. राहुल गांधी त्याला पुरून उरले. शरद पवारही भाजपच्या आयटी सेलला पुरून उरले. शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपला घाबरून माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली, असा प्रचार करण्यात आला होता. पवार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपला त्याची व्याजासह परतफेड केली आहे.

इंग्रजी साहित्यात पोएटिक जस्टिस नावाची एक संज्ञा आहे. मराठीत त्याला काव्यगत न्याय, असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही जे करता ते फिरून तुमच्या वाट्याला येतच असते. अशीच काहीशी अवस्था आता भाजपच्या वाट्याला आली आहे. परिस्थिती कायम आपल्या नियंत्रणात राहिल, असे भाजपला कदाचित वाटले असावे. मात्र, तसे झाले नाही आणि दिवस पालटत गेले. भाजपच्या भाषेतच विरोधक टीका करू लागले. भाजप विरोधकांच्या मनात त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. फिट्टमफाट व्हायला सुरुवात झाली आहे, असे बोलले जाऊ लागले. पण, अशा आनंदाला काहीही अर्थ नसतो, हे जितक्या लवकर कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल.

एखादा आजार झाला की त्याचा उपाय शोधला जातो. तो आजार वाढावा, असा प्रयत्न केला जात नाही. तसे झाले तर अख्ख्या समाजाची नासाडी होण्याचा धोका असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमके हेच होत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आजारावर उपचार करण्याऐवजी तो आजार कसा फैलावेल, असाच प्रयत्न सर्वच पक्षांकडून झाला आहे. यात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे. भस्मासूर काय असतो, याचा अनुभव भाजपला आता येत असणार. हे सर्व सहन करण्यापलीकडे भाजपही आता फार काही करू शकत नाही. अशीच परिस्थिती अन्य पक्षांचीही झाली आहे. आपल्या तिखट माऱ्याने विरोधकांना रक्तबंबाळ करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाट्यालाही असे प्रसंग येत आहेत.

असे प्रकार कधी सुरू झाले? याचे उत्तर आहे 2014 च्या निवडणुकीपूर्वी. राहुल गांधी यांनी मुंबईच्या लोकलमधून प्रवास केला आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच त्यांचे प्रतिमाहनन करण्यास सुरुवात झाली. सोशल मीडिया, आयटी सेलद्वारे नेत्यांची मानहानी करण्याचा प्रकारही त्यावेळेसपासून सुरू झाला. अर्थात राहुल गांधी हे त्याचे पहिले बळी ठरले. 2014 नंतर पाच वर्षे हा प्रकार एकतर्फी पद्धतीने जोमात सुरू राहिला. 2019 नंतर थोडा फरक पडला. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, याचा विसर पडून समाजमाध्यमांवर त्यांच्यावरही विखारी टीका सुरू झाली. ही प्रतिक्रिया आहे, असे म्हणून सूज्ञ नागरिकांना अंग झटकता येणार नाही. मोदी यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी पंतप्रधान म्हणून त्यांचा सन्मान केला गेलाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर टीका केली जाऊ नये. टीका आणि मानहानी यातील पुसट रेषा समजून घेणे गरजेचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधानच होते. त्यांच्यावर टीका करताना भाजपवाल्यांना भान राहत नाही, हेही दुर्लक्षित करता येणार नाही.

तर मूळ मुद्दा आहे भास्कर जाधवांचा. नितेश राणे हे उद्धव ठाकरे यांच्यावर वाट्टेल त्या भाषेत टीका करतात म्हणून भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाट्टेल त्या भाषेत बोलावे, याचे कदापिही समर्थन केले जाऊ शकत नाही. महात्मा गांधीजी म्हणाले होते, An Eye for Eye will make the whole world blind. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ठेवायला हवी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असे होताना दिसत नाही. एकजण बोलला की त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहावा, त्यांचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांना हे करावे लागते, असे कारण दिले जाऊ शकते, पण सुसंस्कृत समाजाला ते मान्य होईल, याची शक्यता नाही. असे असले तरी सर्व राजकीय पक्ष मिळून असे प्रकार थांबवतील, याची शक्यता वाटत नाही.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT