भरूच : गुजरातमधील भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी काल (ता.29) पक्षाला रामराम केला होता. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदारकीचा राजीनामा देणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, वसावा यांनी 24 तासांतच यू-टर्न घेत राजीनामा मागे घेतला आहे. सहा वेळा खासदार असलेल्या वसावा यांच्या राजीनाम्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. वसावा यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी खासदार म्हणून मिळणाऱ्या मोफत उपचाराचे कारण दिले आहे.
वसावा यांनी आदिवासी विकासाच्या मुद्यावरून भाजपला अनेक वेळा घरचा आहेर दिला आहे. वसावा यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करणारी पर्यावरण आणि वन मंत्रालयाची अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी केली होती.
वसावा यांनी सहा वेळा भरूच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वसावा यांनी राजीनाम्याचे पत्र २३ डिसेंबरला गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले होते. या पत्रात वसावा यांनी म्हटले होते की, माझ्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, असे मला वाटते, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आतापर्यंत मी भाजपशी प्रामाणिक राहिलो मला माफ करावे.
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मी लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवणार आहे. माझा हा संदेश पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोचविण्यात यावा, असेही वसावा यांनी स्पष्ट केले आहे.
वसावा यांनी आज मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना वसावा म्हणाले की, मी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मला सांगितले की मी खासदार राहिलो तर पाठदुखी आणि मानदुखीवर मला मोफत उपचार मिळतील. मी खासदारकीचा राजीनामा दिल्यास हे शक्य होणार नाही. पक्षाच्या नेत्यांनी मला विश्रांती घेण्यास सांगितले असून, माझ्या मतदारसंघात स्थानिक कार्यकर्ते माझे काम पुढे नेतील.
मी केवळ प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. याबाबत आज मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता ज्येष्ठ नेत्यांना मला शब्द दिल्याने मी राजीनामा मागे घेत आहे. खासदार म्हणून मी जनतेची सेवा करीत राहीन.
वसावा यांचा राजीनामा हा दबावतंत्राचा भाग असल्याची शक्यता आधीच व्यक्त होत होती. कारण त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक विषयांना पक्ष गंभीरपणे घेत नसल्याचे दिसत होते. याचबरोबर राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांबद्दल वसावांची नाराजी होती. ते राज्यातील नेत्यांवर जाहीरपणे टीका करीत होते. पक्षाने आपले म्हणणे ऐकावे यासाठीच वसावा यांनी हे पाऊल उचचले असण्याची शक्यता व्यक्त होत होती आणि अखेर ती खरी ठरली आहे.
Edited by Sanjay Jadhav
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.