bjp president j p nadda said congress party is lying to country
bjp president j p nadda said congress party is lying to country  
विश्लेषण

सध्या काँग्रेसकडे एकच काम शिल्लक..ते म्हणजे खोटे बोलणे!

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, दूरदृष्टीने आणलेल्या तीन विधेयकांच्या अध्यादेशांना काँग्रेसने आधी पाठिंबा दिला होता. मात्र, आता संसदेतील मंजुरीवेळी हा पक्ष राजकारणापोटी याला विरोध करत आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज केली. 

नड्डा म्हणाले की, जीवनावश्‍यक वस्तू कायदादुरूस्ती, व्यापार व वाणिज्य (संवर्धन- सुविधा) व शेतकरी करार -सशक्तीकरण व संरक्षण (कंत्राटी शेती) ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. सरकारने याबाबतचे अध्यादेश आणण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी अनेक वेळा चर्चा केली होती. याचबरोबर काँग्रेसनेही तिन्ही अध्यादेशांना जाहीर पाठिंबा दिला होता. 

काँग्रेस या तीन विधेयकांना आता विरोध करून शेतकऱ्याचे अहित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगून नड्डा म्हणाले की, कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणुकीची व कंत्राटी शेतीची तरतूद नव्या विधेयकात आहे. मात्र, शेतीची मालकी शेतकऱ्यांकडेच राहील व तिला कोणी धक्का लावू शकत नाही. काँग्रेस या मुद्यावर जनतेशी खोटे बोलत आहे. यामुळे या पक्षाचा दुतोंडीपणा आता जगासमोर आला आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे व खोटे बोलणे एवढेच काम काँग्रेसकडे शिल्लक राहिले आहे. 

सध्याचा जीवनावश्‍यक वस्तू कायदा सन 1955 मधील आहे. तेव्हाच्या तुलनेत आता कृषी उत्पादनांचे प्रमाण खूप वाढले आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाबद्दल अपवादाच्या परिस्थितीत हा कायदा करावा लागत आहे. व्यापार व वाणिज्य कायद्यामुळे शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेरही आपली उत्पादने विकू शकतील. सध्याचा भाव व भविष्यातील भावाचा अंदाजही त्यांना मिळू शकेल. शेतकरी सशक्तिकरण व संरक्षण विधेयकात कंत्राटी शेतीची तरतूद असली तरी शेतीची मालकी शेतकऱ्यांकडेच राहणार याची काळजी घेण्यात आली आहे, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT