Andhra Pradesh Political News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचे विधान केले होते. त्याला बराच काळ लोटला. त्यानंतर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि लोकसभेची निवडणूकही पार पडली. या सर्वच निवडणुकांमध्ये आरएसएसची ताकद भाजपला कळाली. संघाच्या देशभरातील नेटवर्कमुळे भाजपला सत्तेमध्ये जाता आले आहे. त्यामुळे भाजपकडूनही आरएसएसच्या कट्टर स्वयंसेवकांना राजकीय व्यासपीठावरही मोठी संधी दिली जात आहे. त्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेची पोटनिवडणूक होत आहे. खरंतर या राज्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार सहजपणे निवडून आला असता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विनंतीनंतर चंद्राबाबूंनी ही जागा भाजपला सोडली. त्याआधी काही दिवसांपूर्वी भाजपचे दक्षिणेतली धडाकेबाज नेते के. अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना केंद्रीय पातळीवर संधी देण्याचे संकेत शहांनी दिले होते. त्यामुळे आंध्र प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचे नाव जाहीर होऊ शकते, अशी जोरदार चर्चा होती. त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्या स्मृती इराणी यांचीही चर्चा होती. पण भाजपने या बड्या नेत्यांना धक्का दिला आहे.
भाजपने आरएसएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कट्टर स्वयंसवेक असलेले पका वेंकट सत्यनारायण यांचे नाव जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. ते राज्यसभेचे खासदार होणार, हे निश्चित आहे. पण त्यांना तिकीट मिळाल्याने भाजपच्या खेळीबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामागे अनेक कारणेही आहेत. सत्यनारायण हे अनेक वर्षांपासून आरएसएसशी जोडले गेले आहेत. संघाच्या माध्यमातूनच ते भाजपमध्येही सक्रीय झाले. पक्षाच्या ध्येयधोरणांची त्यांना चांगली जाण आहे. मागील दोन दशके ते विविध निवडणुकांमध्ये भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्यही राहिले आहेत.
सत्यनारायण यांना तिकीट देत भाजपनेही संघातील कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यनारायण यांनी वयाच्या १५ व्यावर्षीच संघाचे काम सुरू केले होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी संघाच्या प्रचारात जोर लावला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही ते सक्रीय होते. १९८० मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना अनेक पदे मिळत गेली. आंध्र प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते. नगरसेवकपद सोडता त्यांना इतर निवडणुकांमध्ये कधीच यश मिळाले नाही. एकदा लोकसभा तर एकदा विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले आहे.
कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षासाठी निस्वार्थपणे कसे झटावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्यनारायण असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. इतकी वर्षे भाजप आंध्रात एकदाही सत्तेत नव्हता. चंद्राबाबूंमुळे भाजपला चांगले दिवस आले आहेत. त्याचा पुरेपुर फायदा घेत भाजपने येथील नेत्यांना ताकद देत पक्षवाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यासाठी आरएसएसचा मोठा हात डोक्यावर असावा लागणार आहे, याची जाणीवही पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कोणताही गाजावाजा नसताना सत्यनारायण यांना तिकीट देत भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
कर्नाटक वगळता भाजपला दक्षिणेत इतर कोणत्याही राज्यांत पाय रोवता आलेला नाही. मागील वर्षी पहिल्यांदाच कर्नाटक सोडून दुसऱ्या राज्यात म्हणजेच आंध्र प्रदेशात भाजपला सत्तेत सहभागी होता आले. भाजपची ही मोठी संधी चालून आली आहे. पुढील निवडणुकीपर्यंत आंध्रात आपली ताकद वाढविण्याच्यादृष्टीने भाजपने सत्यनारायण यांना दिलेले खासदारकीच तिकीट महत्वाचे पाऊल ठरणार आहे. मातब्बर नेत्यांना खाली बसवत आरएसएसच्या कट्टर समर्थकाला संधी देत भाजपने ते अधोरेखित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.