Amit Shah | Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

BJP Releases First List: भाजपला बंडखोरीची भीती; 'गुजरात पॅटर्न' नको रे बाबा! विद्यमानांचा जीव पडला भांड्यात

Maharashtra BJP Releases First List Of 99 Candidates: कामगिरी समाधानकारक नसलेल्या किमान 50 आमदारांची तिकीटे कापण्याचा गुजरात पॅटर्न राबवण्याचे संकेत अमित शाह यांनी अलीकडेच दिले होते. भाजपच्या पहिल्या यादीत त्या संकेताला नव्हे, तर बहुतांश विद्यमान आमदारांना स्थान मिळाले आहे.

अय्यूब कादरी

Mumbai News: भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली आहे. उमेदवारी देताना काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध डावलण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत 14 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती, यंदा मात्र पहिल्याच यादीत 13 महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

असे असले तरी यातील नवे चेहरेही प्रस्थापित घराण्यांतूनच आहेत. कामगिरी समाधानकारक नसलेल्या निम्म्या आमदारांची तिकिटे कापण्याचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिले होते, मात्र ते अंगलट येईल, या शक्यतेने राबवण्यात आल्याचे दिसत नाही.

महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजप 150 जागांच्या खाली यायला तयार नाही, असे दिसत आहे. हा तिढा सुटलेला नाही. तिकडे महाविकास आघाडीतही काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत पहिली उमेदवारी जाहीर करून भाजपने एका अर्थाने बाजी मारली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप, काँग्रेसने प्रत्येकी 14 महिलांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी 8 महिलांना तर बहुजम समाज पक्षाने 13 महिलांना संधी दिली होती.

यंदा महायुतीकडून अधिक महिला उमेदवारांना संधी मिळणार, याचे संकेत भाजपच्या पहिल्या यादीतून मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना लागू केली होती. त्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. ते डोळ्यांसमोर ठेवूनच महिला उमेदवारांची संख्या वाढवली जाऊ शकते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत आहे. फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांतदादा पाटील आदींनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

मराठवाड्यात तुळजापूर मतदारसंघातून आमदार राणाजगजतिसिंह पाटील, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार आदींना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

पहिल्या यादीत बहुतांश आमदारांना स्थान मिळाले आहे. गुजरात पॅटर्न राबवला गेला असता तर बंडखोरी उफाळून आली असती. महाराष्ट्र हा कोणत्याही अर्थाने गुजरात नाही, हे वरिष्ठांच्या लक्षात आले असणार. त्यामुळे बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. या यादीतील 99 पैकी 10 नवीन चेहरे आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजपला अनेक टापूंमध्ये गळती लागली आहे. गणेश नाईक हेही तुतारी हाती घेणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पहिल्या यादीत नाईक यांना स्थान देऊन भाजपने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला होता. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट फडणवीस यांची भेट घेऊन देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. सोलापूर उत्तर मतदारसंघातूनही विजयकुमार देशमुख यांच्याही नावाला विरोध सुरू झाला होता.

भाजपने या दोघांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तुळजापूर मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. तेथेही भाजपने विद्यमान आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पु्ण्यातील पर्वती मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ यांनाही पक्षांतर्गत विरोध झाला होता, मात्र पक्षाने तो विरोध डावलला आहे.

ठाणे येथे शिंदे गटाच्या नेत्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड हे कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपला त्यांचा काही उपयोग झाला नव्हता. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे अशोक चव्हाण संकटात सापडले होते. विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबत आलेल्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा संदेश भाजपने याद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे नितेश राणे यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

भाजपने दहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. दुसरीकडे, काही विद्यमान आमदारांना वेटिंवर ठेवून त्यांची धडधड वाढववली आहे. विनोद शेलार (मालाड पश्चिम), प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा), राजेश बकाने (देवळी), श्रीजया चव्हाण (भोकर), विनोद अग्रवाल (गोंदिया), शंकर जगताप (चिंचवड), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), राहुल आवाडे (इचलकरंजी), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), अमोल जावळे (रावेर) या नवीन चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

भारती लव्हेकर (वर्सोवा, मुंबई), सुनील राणे (बोरिवली), पारग शाह (घाटकोपर पूर्व), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), राम सातपुते (माळशिरस) आदी आमदारांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 50 विद्यमान आमदाारांची तिकिटे कापली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कागिरी समाधानकारक नसलेल्या 50 आमदारांची तिकिटे कापली जातील, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या संकेतामुळे निर्माण झाली होती.

मात्र हा पॅटर्न महाराष्ट्रात अंगलट येण्याचीच शक्यता अधिक होता. आमदारांची तिकीटे कापली असती तर बंडखोरी झाली असती आणि अशा आमदारांना अन्य पक्षांचे पर्यायही उपलब्ध होते. त्यामुळेच भाजपने गुजरात पॅटर्न बाजूला ठेवला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT