<div class="paragraphs"><p>Narayan Rane-Ravindra Chavan</p></div>

Narayan Rane-Ravindra Chavan

 

sarkarnama 

विश्लेषण

राणेंच्या साथीला भाजपने असा नेता पाठवला की त्याने पडद्यामागून खेळी केल्या!

एकनाथ पवार


वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा (Sindhudurg District Bank Election) प्रचार रंगात आला असताना अचानक आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी गायब व्हावे लागले. त्याच वेळी महाविकास आघाडीला या बॅंकेत विजय मिळविण्याचा आत्मविश्वास आला होता. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) स्वतः मैदानात उतरले आणि त्यांनी सूत्रे हलवली. पण त्यांच्या जोडीला भाजपने आणखी एका नेत्याला पाठवले होते. ती जबाबदारी पार पाडली माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी.

नितेश थेट मैदानात उतरू शकत नसल्याने मग चव्हाण यांनी मतदारांना `पटविण्याचे` काम सुरू केले. चव्हाण हे सध्या डोंबिवलीचे नेतृत्व करत असले तरी सिंधुदुर्गमध्ये भाजप वाढविण्याचे काम ते गेली दहा वर्षे करत होते. त्यांचे दोडामार्ग तालुक्यात मूळ गाव आहे. त्यांनी राणे यांनी आखलेले नियोजन नंतर पूर्णत्वास नेले आणि त्याचा भाजपला फायदा झाला. त्यातही बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांचा पराभव करण्यात भाजपने मोठी तयारी केली होती. त्यात चव्हाण यांचा सहभाग होता. भाजपने मतदारांना रसद पुरविण्यात कोठे कमी पडू दिले नाही. जे लोक कुंपणावर होते, त्यांना खेचून आणण्यात चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरली. चव्हाण यांच्या कामाची दखल विरोधकांनाही घ्यावी लागली. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनीही चव्हाण यांचा भाजपच्या विजयात वाटा असल्याचे जाहीरपणे सांगितले.

अखेरच्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराची हातात घेतलेली सूत्रे, त्यांना माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मिळालेली जोड आणि नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर असलेली महाविकास आघाडीची सत्ता उलथविण्यात भाजपला आणि राणेंना यश मिळाले. यापुढील काळात होणाऱ्या निवडणुकांना देखील संघर्षाची धार कशी असेल, हे या बँक निवडणुकीने अधोरेखीत केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची आणि २२६ विकास सेवा सोसायट्यांच्या दृष्टीने आर्थीक वाहिनी मानली जाते. सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी वाढविलेली आणि नावारूपात आणलेली ही बँक गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांना हवीहवीशी वाटु लागली आहे. अनेक वर्षे या बँकेवर (कै.)जाधव यांचेच वर्चस्व होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या बँकेवर नारायण राणेंचे वर्चस्व होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपुर्वी राणेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी राणेंविरोधात बंड करीत शिवसेनेत प्रवेश केला. तिथपासुन गेली दोन वर्षे जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. ही सत्ता खेचण्याची गुप्त रणनीती आखण्यात आली; परंतु श्री.सावंत यांच्या पक्क्या बांधणीमुळे ते शक्य झाले नाही. तेथेच जिल्हा बँक निवडणुक संघर्षाची बीजे रोवली गेली होती.

जिल्हा बँक निवडणूक जाहीर होण्यापुर्वी शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेस या तीनही पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी भाजपाने मात्र स्वबळावर ही निवडणुक लढविण्याची तयारी ठेवत मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही बाजुंनी निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात आली होती. महाविकास आघाडीकडुन मतांची गोळाबेरीज करीत उमेद्‌वार निश्तिच केले जात होते. तर भाजपाकडुन जुन्या नव्यांचा मेळ घालीत उमेद्‌वारांची चाचपणी करण्यात आली.


जिल्हा बँक निवडणुक जाहीर झाली. प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी उमेद्वारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू झाली असतानाच सतिश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. यातून जिल्हा बँक निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला. हल्ल्यानंतर शिवसेनेकडुन आमदार नितेश राणे, संदेश सांवत यांनीच हा हल्ला घडवुन आणला असा आरोप केला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी संशयितांना अटक केली. सचिन सातपुतेला अटक केल्यानंतर मात्र जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्यास प्रारंभ झाला. पोलीसांनी या प्रकरणात आमदार राणे, श्री.सावंत यांना नोटीस बजावुन चौकशी केली.त्यातच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेकडुन या घटनेचा निवडणूक प्रचारात अतिशय खुबीने वापर करण्यात आला.

आमदार नितेश राणे आणि श्री. सावंत हे जिल्हा बँक निवडणूक प्रचार हाताळत असलेली जोडगोळी बाजुला गेल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात खुद्द केंद्रीय मंत्री राणेंना उतरावे लागले. प्रचाराची सर्व सूत्रे मंत्री राणेंनी आपल्या हातात घेतली. त्याचवेळी निवडणुकीची स्वतंत्र रणनिती असणारे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील सक्रीय झाले. राणे आणि चव्हाण यांनी निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले. भाजपकडे राजकीय परिपक्वता असलेल्या पदाधिकाऱ्यांना ठरलेल्या रणनितीनुसार काम करण्याची जबाबदारी देण्यात आली. राणेंचा आदेश शिरसावंध मानुन जबाबदारी दिलेला प्रत्येक पदाधिकारी निवडणूक जिंकण्यासाठीच प्रचंड धडपडत होता. दुसरीकडे महाविकास आघाडीकडुन सतीश सावंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे देखील प्रचारात उतरले.

शिवसेनेने परब हल्ल्यांचे प्रकरण मतदारापर्यंत पोहोचवितानाच बोलरो गाड्यांचे कर्जप्रकरणासह विविध प्रकरणे चव्हाट्यावर मांडुन प्रचारात रंगत आणली. परंतु निवडणुकीतील राणे-चव्हाण पॅटर्न समोर शिवसेनेचा कोणताच मुद्दा टिकु शकला नाही. राणे-चव्हाणांच्या रणनितीसमोर महाविकास आघाडीची रणनिती कुचकामी ठरली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.भाजपाने १९ पैकी ११ जागा एकहाती जिंकत जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविले.महाविकास आघाडीला अवघ्या ८ जागा मिळाल्या. जिल्हा बँकेवर सत्ता काबीज करण्याचे केंद्रीयमंत्री राणेंचे गेल्या दोन वर्षांपासून स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरविण्यात त्यांना यश आले. एवढेच नाही तर ज्यांनी राणेविरोधात बंड करून शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यांचा पराभव करीत कुपंनावरील पदाधिकाऱ्यांना एक संदेश देण्यात देखील राणे यशस्वी झाले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच यावर्षी गाजली. या निवडणुकीत संघर्षाची धार निर्माण झाली.त्यामुळे भविष्यात जिल्हयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष असेल याची झलक या निवडणुकीत जिल्हावासीयांना पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT