shivsena_bjp
shivsena_bjp 
विश्लेषण

युतीचे जागावाटप 50: 50 टक्के पण 103 जागांवरच !

सरकारनामा

नवी दिल्ली :  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेना एकत्रितपणे लढणार असल्याच्या घोषणा वारंवार झालेल्या असल्या तरी यात अंतिम शब्द असणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रस्तावित जागावाटपासाठी नवाच 'फॉर्म्युला'  तयार केला असल्याची  खात्रीलायक माहिती आहे . 

भाजपचा हा नवा फॉर्म्युला  पहिला तर महाराष्ट्रात  शेतकरी कर्जमाफीच्यावेळी लावण्यात आलेल्या अटी  आणि निकष शिवसेना नेत्यांना आठवतील हे नक्की !  

त्यानुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी 50-50 टक्के म्हणजे सरसकट नव्हे; तर सध्या दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या 185 जागा वगळून उर्वरित जागांचे समसमान वाटप करण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून संबंधित नेत्यांना तशाच सुस्पष्ट सूचना गेलेल्या असल्याची माहिती आहे.

2014 च्या निकालांनुसार भाजपकडे 122 जागा आहेत; तर शिवसेनेकडे 63 आमदारांचे बळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे म्हणणे असे आहे, की जागावाटपाच्या टेबलावर बसताना सध्या जिंकलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहणार, हे निश्‍चित करूनच चर्चा सुरू करावी. म्हणजे 288 पैकी सध्या जिंकलेल्या जागा सोडल्या तर जागा उरतात 103. त्यातही मित्रपक्षांसाठी जास्तीत जास्त दहा जागा सोडण्याची भाजपची मानसिकता आहे.   

93 जागांसाठीच पन्नास-पन्नास टक्के, या सूत्रानुसार चर्चा व्हावी व अंतिमतः उर्वरितापैकी साधारण 46-46 जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असे भाजपचे सूत्र आहे. त्यातही जास्त जागा मिळविलेल्या पक्षाला झुकते माप असावे, अशीही मेख मारून ठेवण्याची तयारी भाजपने केली आहे. तसे झाले नाही तर स्वतंत्र लढण्याचीही संपूर्ण सज्जता करून ठेवलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी नुकतेच नगर वा मुंबई दौऱ्यांत तसे सूचक विधान केले होते.  

यवतमाळच्या भाजप जिल्हाध्यक्षांनीही भाजप व मित्र पक्ष  170  जागा लढवणार तर शिवसेनेला 110 जागा सोडणार असे पत्रकांशी बोलताना सांगितले होते . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT