bjp supporters pelted stone at party office in kolkata
bjp supporters pelted stone at party office in kolkata 
विश्लेषण

तिकिट वाटपावरुन भाजपमध्ये राडा; पक्ष कार्यालयावर दगडफेक अन् पोलिसांचा लाठीमार

वृत्तसंस्था

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तिकिट वाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले. पक्ष कार्यालयाबाहेरच भाजप कार्यकर्त्यांना राडा घातला. कार्यालयावरच कार्यकर्त्यांनी  दगडफेक सुरू केल्यानंतर अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. या सर्व गदारोळात पोलिसांनी संरक्षक कडे तयार करुन कार्यालयातील नेत्यांना बाहेर काढले. 

भाजपने तिकिट दिलेल्या उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसमधील आयात उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोलकत्यातील भाजप कार्यालयाबाहेर तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते जमले होते. काही जागांवर पक्षाने दिलेले उमेदवार मान्य नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केली. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यालयातील नेत्यांना पोलिसांनी संरक्षक कडे करुन बाहेर काढले.

तिकिट वाटपावरून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी कालही पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. काल पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय, अर्जुनसिंह आणि शिव प्रकाश यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. काल (ता.15) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकत्यात आले होते. त्यावेळीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  याचबरोबर लोखंडी बॅरिकेडही कार्यालयाबाहेर उभे करण्यात आले आहे. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आता व्हीलचेअरवरुन बसून प्रचार सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची कालची (ता.15) सभा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणी ममतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मेजिया येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी 'हरे कृष्णा हरे हरे, तृणमूल घरे घरे' असा नारा दिला. त्यांनी अमित शहांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, अमित शहांच्या सभांना गर्दीच होत नाही. त्यामुळे काल झारग्राम येथील सभा रद्द करावी लागली. ती सभा रद्द करण्यामागे कोणतेही तांत्रिक कारण नव्हते. देश चालवण्याऐवजी शहा हे कोलकत्यात बसून माझ्याविरोधात कट रचत आहेत. ते तृणमूल नेत्यांचा छळ करण्यासाठी कारस्थाने करत आहेत. 

भाजपला नेमक कांय हवे आहे? तुम्हाला माझी हत्या करायची आहे का? माझी हत्या करुन तुम्हाला ही निवडणूक जिंकता येईल का? तुम्ही चुकीचे आहात. अमित शहा हे निवडणूक आयोग चालवत आहेत का? ते निवडणूक आयोगाला सूचना करीत आहेत. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य गेले कुठे? माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या संचालकांना निवडणूक हटवण्यामागे अमित शहांची सूचनाच होती, असाही आरोप ममतांनी केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT