bjp will give tough fight to mamata banerjee in bhawanipore 
विश्लेषण

भाजपची स्ट्रॅटेजी : एकाच विधानसभा मतदारसंघासाठी 3 खासदार अन् 8 आमदारांची फौज

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने ममतांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे.

वृत्तसंस्था

कोलकता : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात वकील असलेल्या प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले आहे. ममतांना पराभूत करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहेत. 

भवानीपूर या ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचासाठी ही निर्णायक निवडणूक आहे. भाजपनेही ममतांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी भवानीपूर मतदारसंघातील आठ वॉर्डची जबाबदारी आठ आमदारांवर सोपवण्यात आली आहे. याचबरोबर खासदार अर्जुनसिंह यांना मतदारसंघात निरीक्षक बनवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत खासदार सौमित्र खान आणि ज्योतिर्मय सिंह यांना सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे. याचबरोबर लोकप्रिय अभिनेते रुद्रनील घोष यांना प्रचार समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.  

प्रियांका टिबरेवाल या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्णा कमल यांच्याकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. 

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 


निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानं ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक लढवून विजयी होणं आवश्यक आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT