नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरवातीपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. आता या टप्प्यात लस घेणे आणखी सोपे होणार आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी 24 तास सुविधा देण्यास सरकारी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोईनुसार दिवसभरात कधीही लस घेता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. या लसीकरणाबाबत स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली होती. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचे कौतुक केले होते. लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मोदींनी काल भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस ते 28 दिवसांनंतर घेतील.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे की, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने वेळेचे निर्बंध काढून टाकले आहेत. देशातील नागरिक आता कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेत कोरोनाची लस घेऊ शकतात. लस घेण्यासाठी ते त्यांच्या सोईनुसार वेळ निवडू शकतात.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता.
आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.