central government vaccination policy is irrational says supreme court
central government vaccination policy is irrational says supreme court 
विश्लेषण

केंद्र सरकारचे लसीकरण धोरण अन्यायी अन् अतार्किक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. असे असले तरी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. लसीकरण धोरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला धारेवर धरत खडे बोल सुनावले. 

कोरोना महामारीत सर्वांचेच लसीकरण होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाचे वाभाडे काढले. 45 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस देणे आणि त्याखालील वयोगटातील व्यक्तींना सशुल्क लस देण्याचे धोरण प्रथमदर्शनी अन्यायी आणि अतार्किक आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. 

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना संसर्ग होत आहे. त्यांना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागत आहे. याचबरोबर अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही होत आहे. कोरोना महामारीच्या बदलत्या स्वरुपामुळे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस मिळणे आवश्यक आहे. शास्त्रीय आधारावरच विविध वयोगटांचे प्रधान्य सरकारने ठरवायला हवे. 

सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य द्यायला हवे. केंद्र सरकारने पहिल्या दोन टप्प्यांत मोफत लस दिली पण नंतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश व खासगी रुग्णालयांना 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना सशुल्क लस देण्याचे निर्देश दिले. हे धोरण अन्यायी आणि अतार्किक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.   

देशात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT