विश्लेषण

चंद्रकांतदादांच्या "पदवीधर'मधील उत्तराधिकारीपदासाठी भाजपमध्ये सहा जणांमध्ये स्पर्धा

उमेश घोंगडे

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा कालावधी असला तरी भारतीय जनता पक्षाच्यावतीने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील सध्या राज्यातील नंबर दोनचे मंत्री आहेत. चंद्रकांत पाटील कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या जागी लढू शकणाऱ्या नव्या नावांची चर्चा पक्ष वर्तुळात सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सचिन पटवर्धन, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, सांगलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आणि जगदीश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

ेशेखर चरेगावकर राज्यातील 5 ते 6 हजार सहकारी संस्थांशी संबंधित आहेत, त्याचबरोबर सहकारी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या मोहिमेतून हजारो युवकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. राजेश पांडे हे विद्यार्थी परिषदेचे माजी प्रदेश मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे संचालक आहेत. प्रसेनजीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू असून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर नुकतेच निवडून आले आहेत. 

जगदीश कदम हे संघ परिवाराशी संबंधित असून जनता बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. सचिन पटवर्धन हे पिंपरीतील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. चंद्रकांत पाटील उमेदवार नसतील तर या सातपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मात्र निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी असल्याने यांच्याशिवाय आयत्यावेळी अन्य नावदेखील पुढे येऊ शकते, असे या सूत्रांनी सांगितले. उमेदवार कोणताही आला तरी पक्षाच्यावतीने निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तीप्रमाणे गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. 

चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा आमदार झाले आहेत. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे महत्वाची खाती देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मंत्रिमंडळात त्यांचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पक्ष संघटनेत अनेक वर्षे काम केल्याने संघ परिवाराचा पाटील यांच्यावर विश्‍वास आहे. त्यामुळे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविली तरी पदवीधरसाठी पाटील यांच्या पसंतीच्या कार्यकर्त्यालाच उमेदारी मिळण्याची शक्‍यता जास्त असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT