Chandrakant Patil-Rohit Pawar
Chandrakant Patil-Rohit Pawar Sarkarnama
विश्लेषण

रोहितबाबा, ‘हे’ कुठल्या संस्कृतीत बसतं? : चंद्रकांत पाटलांचा पलटवार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagvade) यांना एका पुरुष कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं, हे जरा सांगाल?’ असा सवाल विचारला आहे. (Chandrakant Patil's question to Rohit Pawar)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमात सोमवारी (ता.१६) जोरदार राडा झाला. त्या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ घालणं, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? असा सवाल केला आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटले होते?

गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय, आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.

चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT