Chief Secretary at Raj Bhavan taking Message of the Cabinet
Chief Secretary at Raj Bhavan taking Message of the Cabinet 
विश्लेषण

राज्यपाल-सरकारमधील वादाला फोडणी; मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन मुख्य सचिव राजभवनात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Government) कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे राज्यपाल (Governor) विरुद्ध सरकार असा संघर्ष तीव्र झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही याचे पडसाद उमटले. यानंतर मुख्य सचिवांना राजभवनावर पाठवून राज्यपालांना मंत्रिमंडळाचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Chief Secretary at Raj Bhavan taking Message of the Cabinet)  

राज्यपालांचा काही जिल्ह्यांत दौरा होणार असून या दौऱ्यात ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. यावर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपाल वारंवार अधिकारात हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.

राज्यपाल हे हिंगोली, परभणी आणि नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. या तीनपैकी दोन जिल्ह्यांत राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावतील. त्याला आमचा विरोध नाही. परंतु, या तिन्ही जिल्ह्यांत ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेणार असून, याला आमचा आक्षेप आहे. राज्यपालांचा हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. याबाबत मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली असून हा निरोप घेऊन मुख्य सचिव सीताराम कुंटे राज्यपालांकडे जातील, असे मलिक यांनी सांगितले होते.

त्यानुसार कुंटे यांनी राजभवनात जाऊन मंत्रिमंडळाचा निरोप पोहचवला आहे. राज्यपालांचे अधिकार व राज्य सरकारच्या अधिकारांबाबत त्यांनी राज्यपाल कार्यालयाला माहिती दिल्याचे समजते. मुख्य सचिवांच्या या निरोपावरून ठाकरे सरकार व राज्यपालांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यपालांच्या दौऱ्याविषयी माहिती देताना मलिक म्हणाले, हिंगोलीत विद्यापीठ नसतानाही राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत. याचबरोबर परभणीतही प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यपालांच्या या बैठका होत आहेत. ही सरकारच्या कामात ढवळाढवळ सुरू आहे. राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचे भासवण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून सुरू आहे. याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना याबाबत सूचना देतील, असे मलिक यांनी सांगितले. 

राज्यपाल कोश्यारी हे आधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना अजूनही आपण मुख्यमंत्री आहोत असच वाटत आहे. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल. राज्यपाल हे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणत आहेत. या आधी राज्यपालांनी कोरोना संदर्भात आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी याची केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी अशा बैठका घेणे थांबवले होते. आता पुन्हा त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, असे मलिक यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT