CJI N. V. Ramana  File Photo
विश्लेषण

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक न झाल्याने सरन्यायाधीश संतापले अन् म्हणाले...

घटनेला पाच दिवस उलटूनही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झालेली नाही. यावरून सरन्यायाधीशांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला पाच दिवस उलटूनही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झालेली नाही. यावरून सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (CJI N.V.Ramana) यांनी आज राज्यातील भाजप (BJP) सरकारला धारेवर धरले आहे. याचबरोबर पोलिसांऐवजी दुसऱ्या तपास यंत्रणांकडे हे प्रकरण सोपवण्याची सूचनाही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकासह पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज नाराजी व्यक्त केली. न्यायालय म्हणाले की, हा अतिशय निघृण हत्येचा प्रकार आहे. सरकार, व्यवस्था आणि पोलीस यांना जबाबदारीने वागण्याची आम्ही अपेक्षा करीत आहोत. ज्या पद्धतीने कार्यवाही करायला हवी तशी होताना दिसत नाही. आतापर्यंत आरोपीला अटक झालेली नाही. इतर प्रकरणांमध्येही तुम्ही अटक न करता केवळ समन्स बजावता का? तुम्ही यातून चुकीचा संदेश देत आहात.

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी म्हणणे मांडले. शवविच्छेदन अहवालात गोळ्यांच्या जखमा आढळलेल्या नाहीत. घटनास्थळी गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळाल्या आहेत. बहुदा आरोपीचा नेम चांगला नसावा, असे त्यांनी सांगितले. आरोपीला अटक न करण्याचे हेच कारण आहे, अशी विचारणा यावर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी केली.

या प्रकरणी दुसऱ्या यंत्रणेमार्फत तपास करण्याच्या पर्यायावर उत्तर प्रदेश सरकारने विचार करावा. दुसरी तपास यंत्रणा तपास हाती घेत नाही तोपर्यंत या प्रकरणातील पुरावे संरक्षित राहतील, याची काळजी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घ्यावी. पुढील सुनावणीवेळी आमचे समाधान झालेले असेल आणि दुसऱ्या तपास यंत्रणेचा पर्यायही तुम्ही निवडला असेल, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने गदारोळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल (ता.7) दणका दिल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी थेट मिश्रांच्या घरावरच नोटीस चिकटवली. आशिष याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस होती. परंतु, अटकेच्या भीतीने तो चौकशीला हजर राहिला नाही. त्याच्यावर काय कारवाई पोलीस करतात, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT