विश्लेषण

आजचा वाढदिवस : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास देवेंद्र फडणवीस यांचा झाला....

सरकारनामा ब्युरो

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास देवेंद्र फडणवीस यांचा झाला. अवघ्या चाळीशीत ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसले. एकविसाव्या वर्षी 1992 मध्ये नगरसेवक म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते तेव्हा नागपुरातील सर्वात तरुण नगरसेवक होते. त्यानंतर पाचच वर्षांनी त्यांना नागपूरचे महापौरपद मिळाले.

नागपूरचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर केवळ दोनच वर्षांनी 1999 मध्ये ते पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. विधानसभेत गेल्यानंतर फडणवीस यांच्या कर्तृत्वाला झळाळी आली. विधानसभेत विविध सामाजिक व लोकांच्या हिताचे प्रश्‍न उचलून सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा मान मिळाला. अभाविपचा कार्यकर्ता, त्यानंतर भाजयुमोचा शहर अध्यक्ष, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी भूषविले. ते प्रदेशाध्यक्ष असताना भाजपची सत्ता राज्यात आली. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या हिताचे व विदर्भाच्या विकासाचे अनेक प्रश्‍न त्यांनी मार्गी लावले. अल्पावधीत प्रशासनावर जम बसवला. नेतृत्त्वाचे नवखेपण कुठेही दिसू दिले नाही. जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, प्रमुख शहरांतील मार्गी लागणारे मेट्रो प्रकल्प, प्रशासनात आलेली गतिमानता, पारदर्शकता आणण्यासाठी तयार केलेले विविध कायदे यांमुळे फडणविसांची कारकिर्द आज झळाळून निघाली आहे.

नवी दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांशी असलेले उत्तम संबंध यामुळे त्यांना राज्यात काम करण्यास भरपूर मोकळीक मिळाली. त्याचा उपयोग त्यांना प्रशासकीय कारभारात गती आणण्यास झाला. मुंबईपासून ते गाव पातळीपर्यंत भाजपची सत्ता आणण्यात फडणविसांची स्वच्छ प्रतिमा उपयोगी पडली. त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय भवितव्य आणखी उज्ज्वल आहे, याची खात्री त्यांच्या समर्थकांना वाटते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT