विश्लेषण

मुख्यमंत्री असतानाही फोन उचलणारा भाऊ 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप 'बिझी' असतात, फोन घ्यायला बरेच 'पीए' असतात, असे ऐकले होते. परंतु, माझे बंधू देवेंद्र मुख्यमंत्री असताना फोन स्वतःच उचलतात. मुख्यमंत्री असतानाही फोन उचलणारा हा भाऊ असल्याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहिण भावना खरे यांनी आपल्या भावना 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सख्खी बहिण नाही. भावना खरे या चुलत भगिनी आहेत. चुलत बहिणी मुख्यमंत्री फडणवीस यांना दरवर्षी राखी बांधतात. ही परंपरा लहानपणापासून सुरू आहे. यात कुठेही खंड पडला नाही. आजही मुख्यमंत्री नागपुरात होते. ते भावना खरे यांच्या घरी गेले व तेथे राखी बांधून घेतली.

याबाबत भावना खरे म्हणाल्या, ''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल साऱ्यानाच अभिमान आहे. तसाच तो मलाही आहे, असे सांगत भावना खरे म्हणाल्या, मध्यमवर्गीयांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल एक कुतूहल असते. ते माझ्याही मनात होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रशी आपल्याला नेहमीप्रमाणे बोलता येईल काय? हा माझ्या मनातील प्रश्‍न होता. परंतु एकदा फोन केला तर खुद्द मुख्यमंत्रीच फोनवर बोलत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल असलेले अनामिक कुतूहल गळून पडले.''

''मुख्यमंत्री असतानाही फोन घेणारा, प्रत्येक एसएमएसला तात्काळ उत्तर देणारा व्यक्ती आपला भाऊ आहे, याचा अभिमान आहे. देवेंद्रचा राजकीय प्रवास माझ्यासमोर झाला आहे. देवेंद्रला पहिले राजकीय वळण श्रीनगर येथे झालेल्या तिरंगा रॅलीने मिळाले होते. त्यावेळी आम्ही दिल्लीतच होतो. देवेंद्र महाविद्यालयीन विद्यार्थी होता. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात 15 ऑगस्टला श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. देवेंद्रची ही पहिली राजकीय रॅली होती. तेव्हापासून आतापर्यंतच प्रवासात अनेक टप्पे आले.'' असेही त्यांनी सांगितले 

''नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री अशी पदे माझ्या भावाने भूषविली. परंतु, भाऊबीज व राखी पौर्णिमा कधी चुकली नाही. आजही वेळ काढून देवेंद्र घरी आला. बांबूने तयार केलेली राखी आज खास करून देवेंद्रच्या मनगटावर बांधली.'' असे सांगताना भावना खरे यांच्या भावना उचंबळून आल्या होत्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT