CM Uddhav Thackeray Orders Police to Act Fast on Crime Against Women
CM Uddhav Thackeray Orders Police to Act Fast on Crime Against Women 
विश्लेषण

राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ''महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे. 

निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा

गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे.'' हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश श्री. ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, "काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे.'' पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

''पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलीसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे,'' अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीत व्ह‍िडिओ कॉन्फरन्सवर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रारंभी श्री. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT