राष्ट्रवादीचे "अंडरवर्ल्ड'शी संबंध : आमदार लक्ष्मण जगताप 
राष्ट्रवादीचे "अंडरवर्ल्ड'शी संबंध : आमदार लक्ष्मण जगताप  
विश्लेषण

"पीएमओ'कडे तक्रार करणारा कंत्राटदार "मोक्‍का'तील आरोपी ! : आमदार लक्ष्मण जगताप

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील टक्केवारीच्या खोट्या तक्रारीमागे राष्ट्रवादी असून ती देण्यासाठी त्यांनी "मोक्का'तील सराईत गुंड प्रमोद साठे याला पुढे असल्याचा पलटवार भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला. यामुळे राष्ट्रवादीचे "अंडरवर्ल्ड'शी असलेले सबंध उघड झाले असून सत्ता गेल्याने पिसाळल्याने ते या थराला गेल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. नाहक बदनामी केल्याने साठे यांच्यासह राष्ट्रवादीविरुद्ध बदनामीची दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जगताप यांच्यासह पक्षाचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि पिंपरी पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे या दोनशे कोटी रुपयांची थकीत बिले देण्यासाठी तीन टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप साठे याने पंतप्रधान कार्यालयाकडे केला होता. त्यावर काल (ता.3) राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याला जगताप यांनी उत्तर दिले. पिंपरी पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनाही त्यांनी "क्‍लीन चीट' दिली. त्यांच्याविरुद्ध आपल्याला प्रथम चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्या बदलीचे प्रयत्न आपण सुरू केले होते, असे सांगताना सत्यस्थिती कळाल्यानंतर या प्रामाणिक अधिकाऱ्याविरुद्धची ही कार्यवाही थांबविल्याचेही त्यांनी सांगितले. 

जगताप म्हणाले,""राष्ट्रवादीचा माजी स्थायी समिती अध्यक्ष व एका विद्यमान नगरसेवकाने साठे याच्याशी संगनमत करून त्याला ही तक्रार देण्यास भाग पाडले आहे. पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांच्या खून प्रकरणातील आरोपी असलेल्या साठे याचे राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांशीही उठबस आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे पैसे अडकल्याने हे दबावतंत्र त्यांनी सुरू केले आहे. पुणे येथील विश्रामबाग पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेला साठे हा एका डॉनच्या टोळीतील सराईत गुंड आहे''. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT