Udayanraje-Ramraje.
Udayanraje-Ramraje. 
विश्लेषण

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील संभाव्य संघर्ष एसपी संदीप पाटलांमुळे टळला

उमेश बांबरे

सातारा : विधानसभा परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा येथील सर्किटवर थांबले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले शासकीय विश्रामगृहात आले . उदयनराजे रामराजेंना उद्देशून आक्रमक भाषा बोलत होते . त्यामुळे तेथे  बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.

याप्रकारची  माहिती विश्रामगृहातच  बसलेल्या एसपींना मिळताच ते बाहेर आले व त्यानंतर उदयनराजे निघून गेले. या सर्व प्रकारामुळे विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 

खासदार उदयनराजे व सभापती रामराजे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुध्द   सुरू आहे. याचे पर्यवसन एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करण्यावर गेले आहे. आज याचा प्रत्यय शासकीय  विश्रामगृहात आला. विधान परिषदेचे सभापती काल (सोमवारी) रहिमतपूरचा कार्यक्रम उरकून विश्रामगृहात मुक्कामी थांबले होते. आज सकाळी ते जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस सकाळी निघून गेले. बॅंकेतील बैठकीस खासदार उदयनराजेही येणार असल्याने बॅंकेत मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. पण उदयनराजे बैठकीसाठी आले आणि सही करून निघून गेले.

बैठकीनंतर सभापती रामराजे जिल्हा बँकेच्या  ऍन्टी चेंबरमध्ये थांबले असताना पोलिस अधीक्षकांनी दूरध्वनीवरून रामराजेंना भेटण्यास येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी विश्रामगृहात या तेथेच मी थांबणार आहे, असे रामराजेंनी सांगितले. त्यानंतर रामराजे विश्रामगृहात आले. त्यानंतर थोड्याच वेळात पोलिस अधीक्षक संदीप पाटील विश्रामगृहात आले. दोघांत सुमारे तासभर चर्चा झाली. तोपर्यंत खासदार उदयनराजेंचा अंगरक्षक रामराजेंच्या  सुटकडे आला व त्याने खासदार साहेब आलेत असे सांगितले. 

त्यावर कक्षाबाहेर असलेले पोलिस आणि अधीक्षक संदीप पाटील सुटच्या बाहेर गेले. तोपर्यंत उदयनराजे गाडीतून खाली उतरून पायऱ्या चढून वर आले आणि कुठे आहेत असे म्हणत  त्यांनी आक्रमक भाषा वापरली .यावेळी तेथे पोलीस आणि कार्यकर्तेही होते . तोपर्यंत पोलिस अधिक्षक संदीप पाटील त्यांच्याजवळ आले. दोघेही दोन क्रमांकाच्या सुटकडे चालत गेले आणि परत आले. त्यानंतर उदयनराजे गाडीकडे गेले आणि 'या भगीरथामुळे जिल्ह्याचे वाटोळे झाले,' असे म्हणतच गाडीत बसले आणि निघून गेले, असे प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्यांनी सांगितले . यावेळी गाडीत त्यांच्यासमवेत विकास शिंदे हे होते. त्यापाठोपाठ आणखी एक गाडी ही निघून गेली.

 यानंतर अधीक्षक संदीप पाटील पुन्हा रामराजेंच्या कक्षात आले. तेथे थोडावेळ चर्चा केल्यानंतर श्री. पाटील निघून गेले. यासर्व प्रकारामुळे विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या प्रकाराबाबत रामराजेंना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी," मला आत्ता काहीही बोलायचे नाही. वेळ आल्यावर मी बोलायला घाबरणार नाही," असे सांगितले . त्यानंतर रामराजे कार्यक्रमासाठी निघून जाईपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT