भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भाजप (BJP) सरकारच्या विरोधात पक्षाच्याच खासदाराने आघाडी उघडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसने (Congress) या खासदाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे राज्यातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे.
देशी वंशाच्या बैलांची नसबंदी करण्याच्या आदेशावरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने 12 लाख बैलांची नसबंदी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कामाचे नसलेले आणि निकृष्ठ वंशाच्या बैलांची नसबंदी करण्याची सरकारची योजना आहे. यावरून भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट आपल्याच पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशी वंशाच्या गायींना नामशेष करण्यासाठीचे हे षडयंत्र आखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारने देशी वंशाच्या गायी नष्ट करण्यासाठी हे कारस्थान केले आहे. हे आधी घडत असले तरी आता ते घडायला नको. जे चूक आहे ते कायम चूकच राहणार आहे, असे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. आता ठाकूर यांच्या बाजूने काँग्रेस मैदानात उतरली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी या मुद्द्यावर ठाकूर यांना पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे. देशी वंशाच्या गायी संपवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याची टीका त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे आधीपासून राज्यात बैलांची नसंबदी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप सरकारच्या काळात हे चालत आले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे सरकार असताना 2017-18 मध्ये 10.6 लाख बैलांची नसबंदी झाली होती. कमलनाथ यांचे सरकार असताना 2019-20 मध्ये 7.61 लाख बैलांची नसबंदी झाली होती. राज्यात 1998-99 ते सप्टेंबर 2021 पर्यंत 1.33 कोटी बैलांची नसबंदी झाली आहे.
प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून उभे राहात काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा पराभव केला होता. त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.