राजकारण म्हटले की काँग्रेस ही पूर्वीपासूनची असलेली ओळख. ज्यांनी संपूर्ण देशामध्ये सत्ता स्थापन करून विविध राज्यांमध्ये सरकारे निर्माण केली. राजकारण करायचे असेल तर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व आणि कार्यकर्ता असणे हीच व्याख्या संपूर्ण देशभरात व राज्यात होती.
काँग्रेसच्या भरभराटीच्या काळात अनेक नेते पक्ष बदलून सत्ता आणि सत्तेचा वापर करून मोठे झाले. अशावेळी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून पडेल ती कामे करून घरचे खाऊन ज्यांनी पक्ष वाढवला त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सत्तेच्या काळात आयाराम-गयाराम असणाऱ्या नेत्यांनी फायदा उचलला. जिल्ह्यामधील निष्ठावंत असलेले Congress कार्यकर्ते कोणत्याही लाभाशिवाय काम करीत राहिले. दुय्यम दर्जाची पदे देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली.
आता सध्याच्या परिस्थितीत एवढे मोठ-मोठे पक्ष फुटून नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते वेगळी वाट निवडत आहेत आणि आपला स्वार्थ साधून राजकारण करीत आहेत. खानापूर व आटपाडी तालुका हा कायम काँग्रेसमय होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या तालमीत तयार झालेले आणि कोणत्याही पदाची लालसा नसलेले निष्ठावान कार्यकर्ते निर्माण झाले.
त्यावेळी संपतराव माने, शहाजीराव साळुंखे, हणमंतराव पाटील अशी दिग्गज नेतेमंडळी या पक्षाच्या मुशीतून तयार होऊन काम करीत राहिले. त्यावेळी हे सर्व नेते पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष ताकद आणि किंमत देत होता. आता देशात आणि राज्यात एवढी भीषण परिस्थिती असतानासुद्धा जे मूळ काँग्रेस कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत, त्यांना मात्र पक्ष कोणतीही ताकद किंवा वरिष्ठ पातळीची पदे देताना दिसत नाहीत. ज्यांच्यामुळे पक्ष शिल्लक राहिला आहे, त्यांना तरी काँग्रेस पक्षाने लागेल ती मदत आणि बळ द्यायला पाहिजे, तरच पक्ष राहील आणि पक्षाला चांगले दिवस येतील.
डॉ. पतंगराव कदम होते त्यावेळी काँग्रेस पक्षातील बऱ्याच कार्यकर्त्यांना किंमतही होती आणि त्यांची कामेही होत होती. त्यांच्यानंतर मात्र हे निष्ठावान कार्यकर्ते पक्षात पोरके झाल्याचे दिसून येत आहेत. सत्ता असताना आणि नसताना डॉ. कदम हे जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कायम बळ देत राहिले आणि त्याच ऊर्जेतून हे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे काम करून पक्षाला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न करीत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकेकाळी सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये काँग्रेसचे सदस्य आणि सभापती होते. खानापूर-आटपाडी मतदारसंघामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आणि मतदार आहे. पण आता याच काँग्रेसला घरघर लागली आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांनी आधीच काँग्रेसची साथ सोडली आहे. तरीपण राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यावर तोडगा काढल्याचे दिसून आलेले नाही. पण हाच काँग्रेस पक्ष आता अगदी नाममात्र शिल्लक असल्याचे तालुक्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. त्यांना चांगल्या निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांची कमतरता भासू लागली आहे, अशी चर्चा सर्व गावांमध्ये सुरू आहे.
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सर्व बाबींवर काय तोडगा काढतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल. अन्यथा पडझड होत राहील आणि निष्ठावान कार्यकर्ते मात्र बाजूला जातील. डॉ. पतंगराव कदम यांच्यानंतर जिल्ह्यातील व तालुक्यातील काँग्रेस पक्ष व पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते पोरके झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात सुरू आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.