Mumbai, 30 April : विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी; म्हणून पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला कोणतीही माहिती न देता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोणतीही माहिती न देता अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी राणा भीमदेवी थाटात विधान परिषद निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मात्र, त्यांना अवघ्या एका दिवसातच माघार घ्यावी लागली. विधान परिषदेतून माघार घेतल्यानंतर काँग्रेसने माघारीची हॅट्ट्रीक केल्याचे पुढे आले आहे.
माघार घेण्याची सुरुवात काँग्रेस पक्षाने राज्यसभा निवडणुकीपासून केल्याचे स्पष्ट होते. राज्यसभा निवडणूक जाहीर होताच अवघे 16 आमदार असलेल्या काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. दुसरीकडे वीस आमदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही राज्यसभेतून आमचेही सदस्य निवृत्त झाले आहेत, त्यामुळे आम्हीही राज्यसभा लढविणार, अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवताच आदळापाट का होईना आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसचे नेते राज्यसभा लढविण्यावर ठाम होते. मात्र, अखेर दिल्लीतून सूत्रं हलताच प्रदेश पातळीवरील नेत्यांना माघार घ्यावी लागली. या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांना पठिंबा दिल्लीतील हायकमांडने पाठिंबा देण्याची सूचना करताच काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला, त्यातून महायुतीच्या उमेदवारांसह शरद पवार यांची राज्यभेवर बिनविरोध निवड झाली.
राज्यसभेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूमुळे रिक्त झालेली बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असून आमचा भाजपला विरोध आहे, असे सांगून सपकाळ यांनी आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, अशी घोषणा सपकाळ यांनी केली होती. मात्र या निवडणुकीतूनही काँग्रेसला माघार घ्यावी लागली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोन, हायकमांडकडून आलेली सूचना आणि राजकीय परिपक्वता दाखवत काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणुकीतूनही माघार घेतली. पण निवडणूक लढविण्याची घोषणा करून माघार घेण्याची वेळ काँग्रेसवर सव्वा ते दीड महिन्यात दुसऱ्यांदा आली.
बारामती पोटनिवडणुकीनंतर विधान परिषदेतील नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार होती. मात्र, राज्यसभा, बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्यावं लागलेल्या काँग्रेसने काहींशी सावध पावले टाकली. कारण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी करणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जाहीर केले होते.
मातोश्रीवर चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे, असे विधानही सपकाळ यांनी केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधीमंडळात न जाण्याचा निर्णय घेत अंबदास दानवेंना विधान परिषदेत पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मात्र, मनधरणी करताच पुन्हा माघार घेतली. काँग्रेसने निवडणूक लढविण्याची घोषणा करून माघार घेण्याची हॅट्ट्रीक पूर्ण केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.